नागपूर : बोगस बियाण्यांची सर्रास विक्री

नागपूर : खरिप हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बियाणे खरेदीची ही प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना कमी किमतीत बोगस बियाणे देऊन दामदुप्पट पैसे उकळणाऱ्या टोळ्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. थेट बोगस बियाणे विक्रीचे कनेक्शन आंध्र प्रदेश आणि गुजरातपर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्याच्या सीमावर्ती गावांतील शेतकऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. आकर्षक रंगाच्या पॅकेजमधील माल शेतकऱ्यांच्या माथी मारला जात आहे. आपल्या मूळ ठिकाणाहून बियाणे बोलवायचे झाल्यास रेल्वे, कुरिअरने किंवा ट्रॅव्हल्सने हा माल शहराच्या वेशीवर दाखल होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकाराला स्वत: जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दुजोरा दिला आहे. बुटीबोरीतून ‘अण्णा’ या सर्व बोगस बियाण्यांचे नेटवर्क ऑॅपरेट करीत असल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे. तसेच काही कृषी केंद्र संचालकांना गाठून अवास्तव कमिशनचे आमिष देऊन त्यांना विक्रीचे प्रमाण वाढविण्याचे सांगण्यात येते. कुही तालुक्यातील आंभोरा, पचखेडी, मांढळ, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी आणि नागपुरातील मौदा, रामटेकच्या आदिवासीबहुल भाग आणि मध्य प्रदेशची सीमा असलेल्या पारशिवनी तालुक्यातील कोलीतमारा, केळवद भागातही या बोगस बियाणे विक्रीचे प्रकार वाढले आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर भागातील जवळपास सलघीच गावे बोगस बियाण्यांच्या पॅकेजिंगचे कामे करतात व विक्रीसाठी त्याची पद्धतशीरपणे विल्हेवाट लावली जाते. नागपुरातील एजन्टाशी संपर्क साधून हे बियाणे विक्रीला पाठविले जाते दुसरीकडे शेतकऱ्यांना ब्रॅण्डेड बियाणेच खरेदी करावेत आणि कमी किमतीतील बियाण्यांना बळी पडू नये असे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

दीड कोटीच्या योजनांना मंजुरी

खरिप हंगामाची तयारी बघता शेतकरी वैयक्तिक लाभाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने आपल्या योजनांचे नियोजन केले आहे. अलिकडेच दीड कोटीच्या लाभाच्या योजनांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. या सर्व योजना डीबीटीतून राबविण्यात येत आहे. २०१९-२० वर्षातील या सर्व योजना आहे. यामध्ये ताडपत्री, फवारणीपंप, पीव्हीसी पाइप, एचडीपीसी पाइप, मोटार इंजिन आणि काटेरी कुंपणाचा समावेश आहे. हे सर्व साहित्य ५० टक्के अनुदानावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना खरिपाच्या हंगामात या सर्व साहित्याची आवश्यकता भासते. ते त्यांना वेळेत उपलब्ध व्हावे, हा हेतू ठेवून लाभाच्या योजनांचे नियोजन करण्यात आले. २०१८-१९ या वर्षातही कृषी विभागाने वैयक्तिक लाभ आणि इतर योजनांचे टार्गेट शंभर टक्के पूर्ण केले. सिंचन विहिरी आणि शेततळ्याच्या खोदकामातही झेप घेतला. या वर्षातील लाभासाठी शेतकऱ्यांनी स्थानिक पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी प्रवीण देशमुख यांनी केले आहे.

अधिक वाचा : नागपूर : पानी न दिल्याने पत्नीची हत्या