नागपूर : ऐतिहासिक २८ स्थळांचा होतोय विकास

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकासाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या स्थळांचा विकास करण्यात येत आहे. मंजूर करण्यात आलेल्या २८ ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यासाठी आता पाऊल टाकण्यात आले. काही स्थळांच्या विकास कामांना सुरुवात झाली असल्याचे समितीचे सदस्य आणि कास्ट्राइबचे अध्यक्ष कृष्ण इंगळे यांनी सांगितले.

ऐतिसासिक वास्तूंना व सेवाभावी संस्थांना अनुदान मंजूर करण्यापूर्वी मार्गदर्शक तत्त्वे व मानके ठरविण्यासाठी समिती गठित करण्यात आली होती. समाजकल्याण विभागाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती. कास्ट्राइबचे अध्यक्ष कृष्णा इंगळे या समितीत सदस्य आहेत. या समितीने २०११ ते २०१५ या काळात ४३ स्थळांना भेटी दिल्या. यापैकी २८ स्थळांच्या विकास प्राधान्याने करण्यात येत असून काही स्थळांच्या कामांना सुरुवातही झाली असल्याचे इंगळे यांनी सांगितले.

या स्थळांचा होणार विकास

बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथील बुद्धविहार व परिसराच्या नूतनीकरणासाठी ९९ लाख ९२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केला होता. ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन व्हावे, स्मारक तयार व्हावे या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील चोखोबांचे गाव मेव्हणा राजा, दोन दिवस डॉ. आंबेडकर यांनी मुक्काम केलेले गडचिरोली जिल्ह्यातील दीक्षाभूमी वडसा, देसाईगंज हे ठिकाण, डॉ. बाबासाहेबांची पहिली सभा झालेले कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव, रत्नागिरी जिल्ह्यातील वणंद, ठाणे जिल्ह्यातील आंबेटेंबे या गावांसह एकूण २८ ऐतिसाहिक स्थळांवर ३३ कोटी ७८ लाख ६ हजार २४७ रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे इंगळे यांनी सांगितले.

३१ जुलैला बैठक

ऐतिहासिक स्थळांचा विकास व्हावा, यासाठी येत्या ३१ जुलै रोजी बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विकास कामांना गती मिळावी, यावर या बैठकीत भर देण्यात येणार असल्याचे इंगळे यांनी सांगितले. ४१ ऐतिहासिक स्थळांपैकी प्रलंबित असलेल्या १३ प्रस्तावांवरही या बैठकीत चर्चा होणार आहे. निधी मंजूर झाल्याने विकासकामांना गती मिळाली. समाजात नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे इंगळे यांनी सांगितले.

अधिक वाचा : शहरातील ११ अनधिकृत प्रार्थनास्थळे पाडली