नागपूर : कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाल्याने शहरातील बड्या औषध व्यापाऱ्याची आत्महत्या

नागपूर

नागपूर : कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाल्याने शहरातील बड्या औषध व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तहसीलमधील निकालस मंदिराजवळील कीर्ती अपार्टमेंटमध्ये सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

विनोद चिमनदास रामानी (वय ४४) असे मृताचे नाव आहे. त्यांची निकालस मंदिर, सतरंजीपुरा व वर्धमाननगर भागात अॅपेक्स नावाने सात औषधविक्रीची दुकाने आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विनोद यांनी औषध व्यापाऱ्यासह चित्रपट व अन्य व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी सावकारांकडून सुमारे १० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज घेतले होते. दरम्यान, व्यवसायात नुकसान झाल्याने विनोद यांची आर्थिक परिस्थिती खालावली. सावकरांना कर्ज आणि व्याजाची परतफेड करण्यास ते असमर्थ ठरले. त्यामुळे गत पाच महिन्यांपासून ते तणावात होते.

शनिवारी सकाळी विनोद यांचा त्यांच्या पत्नी भावना यांच्यासोबत वाद झाला. त्यामुळे भावना या दोन अपत्यांसह माहेरी जरीपटका येथे गेल्या. त्यानंतर भावना यांनी विनोद यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. सोमवारी सकाळी भावना या घरी परतल्या. फ्लॅटमधून दुर्गंधी येत होती. भावना यांनी नातेवाइकांना माहिती दिली. माहिती मिळताच नातेवाइक तेथे पोहोचले. नातेवाइक व शेजाऱ्यांच्या मदतीने फ्लॅटचा दरवाजा तोडण्यात आला.

फ्लॅटमध्ये जाताच विनोद हे पंख्याला गळफास लावलेले दिसले. या घटनेची माहिती तहसील पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच तहसील पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. विनोद यांनी शनिवारीच आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तहसील पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

सावकारांच्या धमकीमुळे होते त्रस्त !

विनोद यांना एक सावकार पैसे परत करण्यासाठी सतत त्रास देत होता. पैसे परत न केल्यास ‘तुझा जीव घेईल’, अशी धमकीही या सावकाराने विनोद यांना दिली होती. या सावकाराचे पैसे परत करण्यासाठी विनोद यांनी एक दुकान पाच कोटी रुपयांमध्ये विक्रीलाही काढले होते. सावकाराचा छळ असह्य झाल्याने विनोद यांनी आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात होती.

अधिक वाचा : नागपूर : ऐतिहासिक २८ स्थळांचा होतोय विकास