रामटेक : माजी पंतप्रधान नरसिंह राव, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांना विजयी करणाऱ्या रामटेक लोकसभा मतदारसंघाने चेहऱ्यापेक्षा पक्षावर आधारित निवडणुका अनुभवल्या आहेत. यंदाच्या निवडणुकांमध्ये मात्र पक्ष आणि चेहरा हे दोन्ही मुद्दे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार असे दिसून येत आहे. हा चेहरा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा. मोदींच्या बाजूने झालेले मतदान आणि त्यांच्या विरोधात झालेले मतदान यातील फरक म्हणजे निकाल, अशी चिन्हे आहेत. मतदार ‘डिजिटल इंडिया’ला मतदान करणार की डिजिटलचा दावा करणाऱ्यांना ‘चल निकल’ म्हणणार याकडे लक्ष लागले आहे.
२०१४ सालच्या निवडणुकांप्रमाणेच यंदाही भाजप-सेना युती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर ही निवडणूक लढवित आहे. विरोधी पक्षाने काही स्थानिक मुद्द्यांसोबतच मोदींवरील टीकेला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. रामटेकमधून लोकसभेसाठी १६ उमेदवार रिंगणात आहेत. युतीने विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्या हाती धनुष्यबाण दिला असून निवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना काँग्रेसच्या पंज्याची साथ लाभली आहे. प्रसिद्ध कव्वाल किरण पाटणकर (रोडगे) बहुजन वंचित आघाडीकडून लढत आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराच्या आडनावाशी साधर्म्य असलेल्या सुभाष गजभिये बसपच्या हत्तीवर स्वार आहेत. कृपाल तुमाने यांच्यासाठी भाजपची मोठी टीम राबते आहे. तर, आमच्या उमेदवारला हायजॅक केल्याची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची खंत आहे. किशोर गजभिये मेहनत करीत आहेत. हुशार, अभ्यासू, माजी आयएएस अधिकारी ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. पक्षांतर्गत कुरबुरी, नियोजनाचा अभाव त्यांच्यापुढे अडचणी आणत आहेत. विधानसभेचे तिकीट मिळावे यासाठी आघाडी आणि युतीचे विद्यमान आमदार तसेच आमदारकीसाठी इच्छुक पक्षाच्या उमेदवारासाठी दिवस-रात्र एक करीत आहेत.
डिजिटल आणि कास्तकारी
मौदा शिवसेनेचा तालुका मानला जातो. ग्रामीण भागातील भारत खरेच डिजिटल झाला आहे का, असा येथील एका मध्यमवयीन माणसाला केला असता तो म्हणाला, ‘भाऊ पाच वर्सापूर्वी शेतावरील मजूर काम शोधाले मिस कॉल देत व्हते. गेल्या पाच वर्सात पुरे मिस कॉल बंदच झाले. आता मजूर बी फोन करते. मंग कस म्हन्ता इंडिया डिजिटल नई झाला.’ पारशिवनी बसस्थानकाजवळ सलून चालविणाऱ्या एका तरुणाने यंदा मतदान करण्यात फारसे स्वारस्य नसल्याचे सांगितले. ‘गेल्या पाच वर्षांत आम्ही तुमाने सायबाले बघितलं नाही. आता निवडणुकांसाटी ते आले. काँग्रेसचे किशोर गजभिये कोन हाये हे आम्ही कधी पायलंच नाही. आता मत देऊ कुनाले?’, असे तो म्हणाला. देवलापार आणि पवनी या परिसरातील कोअर जंगल ओलांडण्याची परवानगी नसल्याने आम्हाला पारशिवनीला फेरा मारून पलीकडच्या परिसरातील जावे लागते, अशी नाराजी एका महिलेने व्यक्त केली. सावनेर तालुक्यातील खापा या गावात रविवारी बैलांच्या बाजारासाठी आलेल्या एका शेतकऱ्यांने यंदा निवडणुकांचा माहोल नसल्याची खंत व्यक्त केली. ‘ही पहिलीच निवडणूक पाहतो आहे, ज्यात ना भोंगे ऐकू येऊ आहेत, ना झेंडे दिसत आहेत. दोन्ही उमेदवार आमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. मात्र ही निवडणूक केंद्रात सक्षम सरकार चालविणारा पंतप्रधान देण्यासाठी हाच विचार आम्ही करीत आहोत’, असे हा शेतकरी म्हणाला.
अधिक वाचा : Why Can’t All “Modis” Be Called Relatives, Asks Akhilesh Yadav