साडेचारशे तरुणांचा अकाली मृत्यू

नागपूर : मेळघाटचे साधे नाव घेतले तरी लगेच बालमृत्यू आणि कुपोषण डोळ्यांसमोर उभे राहते. मेळघाटच्या कपाळावर चिकटलेल्या या कोवळ्या पानगळीमुळे हा भाग शापीत झाला आहे. मात्र मेळघाटचे वास्तव त्याहूनही अधिक भयावह आहे. सरकारी योजनाच नाही तर या भागात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना देखील हे वास्तव अद्याप दृष्टीस पडलेले नाही. या भागात अकाली दगावणाऱ्या तरुणांची संख्या बालमृत्यू आणि मातामृत्यूपेक्षाही मोठी आहे, असे महात्मा गांधी ट्रायबल हॉस्पिटलचे (महान) संस्थापक डॉ. आशिष सातव यांनी येथे सांगितले.

असोसिएशन ऑफ सर्जन्सच्या नूतन कार्यकारिणी अध्यक्षपदी डॉ. टी. आर. व्ही. विल्किन्सन यांनी रविवारी हॉटेल सेंटर पॉइंट येथे पदभार स्वीकारला. त्यानिमित्त आयोजित एक दिवसीय चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी आले असता, डॉ. सातव यांनी या ज्वलंत आणि आजवर प्रकाशात न आलेल्या वेगळ्या विषयाकडे लक्ष वेधले.

डॉ. सातव म्हणाले, या भागात ८० टक्के बालके कुपोषण घेऊनच जन्माला येतात. त्यापैकी २० टक्के बालके ही अतितीव्र गटात मोडतात. आजही या भागात ५ हजारांहून अधिक बालके मरणाच्या दारात उभी आहेत. अर्भक मृत्यूदर ५० वरून २५ वर आणायचा आहे. हे आव्हान वाटते तितके सोपे नाही. दुसरीकडे आपण परग्रहावर यान पाठविण्याच्या मोहिमा आखतो. मात्र जमिनीवरील वास्तव त्याहून अधिक भयावह आहे. मेळघाटातली सर्वांत भीषण समस्या आजवर प्रकाशातच आलेली नाही. ती म्हणजे मेळघाटात दरवर्षी एक लाख लोकसंख्येतील ४५० तरुण अकाली मरणपंथाला जात आहेत. कमावत्या वयात म्हणजे १६ ते ६० या वयोगटात घरातला कमावता व्यक्ती विविध कारणांनी दगावत चालल्याने मेळघाटात दरवर्षी ८०० कुटुंब उद्ध्वस्त होतायत. क्षयरोग हे या मृत्यूचे पहिले मोठे कारण आहे. या मृत्यूतील २१ टक्के मृत्यूला क्षयरोग हे मुख्य कारण आहे. त्या खालोखाल १२ टक्के मृत्यू रक्तदाबाने, ११ टक्के हृदयरोगाने, १२ टक्के कर्करोगाने, ५ टक्के मेंदू मलेरियाने तर १०टक्के नैराश्यातून होणाऱ्या आत्मघाताने होत आहेत.

१०० गावांत पथदर्षी प्रकल्प

मेळघाटात अकाली दगावणाऱ्या तरुणांच्या मृत्यूची कारणे शोधण्यासाठी महानच्या सहकार्याने आदिवासी विभाग, जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेतील काही तरुण डॉक्टरांच्या मदतीने सुरुवातीला ४० पाड्यांवर एक पथदर्शी प्रकल्प हाती घेतला गेला. त्याची व्याप्ती १०० पाड्यांपर्यंत वाढविण्यात आली. या मृत्यूची कारणे जाणून घेतल्यानंतर महानने १२ शिफारसी केल्या आहेत. यात आशा सेविकांच्या धर्तीवर तरुणांना प्रशिक्षण, समुपदेशन कार्यक्रम, सामाजिक संस्था, स्थानिकांचा सहभाग, किचन गार्डन- न्यूट्रिशियन फार्म, व्यसनमुक्ती मिशन सारख्या बाबींचा समावेश आहे. बाल, मातामृत्यू पाठोपाठ आता मेळघाटात कमावताच दगावत असल्याने अख्खे कुटुंब विस्थापित होण्याचे प्रमाण वाढले आहे. योजना आखणाऱ्या व्यवस्थांनी हे वास्तव समजून घेतले पाहिजे, असेही डॉ. सातव यांनी नमूद केले.

अधिक वाचा : Toll booth staffer killed in mishap