शपथविधी झाला पण सरकारचं काय होणार? या आहेत 3 शक्यता

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडींनंतर आता विधानसभेत बहुमत करण्याच्या 3 शक्यता आहेत.

देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारचा शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. आता 30 नोव्हेंबरपर्यंत सरकारला बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडींनंतर आता विधानसभेत बहुमत करण्याच्या 3 शक्यता आहेत.

शक्यता क्रमांक 1

अजित पवारांच्या गटाने भाजपला पाठिंबा दिला आहे. पण पक्षांतरबंदी कायद्यानुसार, दुसऱ्या पक्षाला पाठिंबा द्यायचा असेल तर दोन तृतियांश आमदारांचा पाठिंबा लागतो. राष्ट्रवादीचे 54 आमदार आहेत. त्यामुळे 41 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा लागेल. पक्षांतरबंदी कायद्यानुसार शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांवर कारवाई केली तर फडणवीस सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही.

शक्यता क्रमांक 2

राष्ट्रवादीच्या 54 आमदारांच्या सह्यांचं पत्र आमच्याकडे आहे, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. भाजपकडे 105 जागा आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र गृहित धरलं तर भाजपच्या 159 जागा होतात. त्या बहुमतापेक्षाही अधिक आहेत. विधिमंडळाचे गटनेते म्हणून अजित पवार यांचा व्हिप आमदारांना बंधनकारक आहे की नाही हा प्रश्न आहे. शरद पवार यांनी अजित पवारांना पक्षाच्या गटनेतेपदावरून काढून टाकल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेतं ते पाहावं लागेल. फडणवीस सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शक्यता क्रमांक 3

भाजपकडे 105 जागा आहेत. अजित पवारांना 20 ते 25 आमदारांचा पाठिंबा आहे, असं बोललं जातं. त्यामुळे हे सगळे आमदार आणि अपक्ष मिळून फोडाफोडीच्या राजकारणात भाजप बहुमत सिद्ध करू शकतं. देवेंद्र फडणवीस सरकारला 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आलीय. त्यामुळे विधानसभेत नेमकं काय होतं त्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Comments

comments