अजित पवारांनी राष्ट्रवादीतून फोडलेल्या 8 आमदारांची यादी समोर

मुंबई: अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने अजित पवार यांची पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. पण अजित पवार यांनी कोणत्या आमदारांना घेऊन भाजपला पाठिंबा दिला, याबाबत राजकीय वर्तुळात मोठा संभ्रम होता. मात्र आता काही नाव समोर येत आहेत.

राष्ट्रवादीचे मोठे नेते धनंजय मुंडे हेदेखील पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांचा फोन कालपासून बंद असल्याची माहिती आहे. गेल्या काही तासांपासून ते कुणाच्याही संपर्कात नाहीत. त्यामुळे ते अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे.

कोण आहेत ते आमदार?

राष्ट्रवादीचे काही आमदार कालपासून संपर्कात नाहीत. यामध्ये धनंजय मुंडे-परळी, नरहरी झिरवळ – दिंडोरी, दिलीप बनकर – निफाड, माणिकराव कोकाटे – सिन्नर, राजेंद्र शिंगणे, अनिल भाई दास पाटील, संदीप क्षीरसागर आणि स्वत: अजित पवार यांचा समावेश आहे. त्यामुळे सध्यातरी या आमदारांनी पक्षातून बंडखोरी केल्याचं चित्र आहे. मात्र यातील काही आमदार पुन्हा राष्ट्रवादीकडे येण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीसह पवार कुटुंबात फूट

धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांसारखे राष्ट्रवादीतील मोठे नेते नक्की काय भूमिका घेणार, यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची अनेक समीकरणं ठरणार आहेत. जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल हे तर शरद पवार यांचे कट्टर समर्थक समजले जातात. मात्र धनंजय मुंडे आणि सुनिल तटकरे यांचे शरद पवारांसह अजित पवार यांच्यासोबतही जवळचे संबंध आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी फुटल्यानंतर हे नेते नक्की कुणासोबत जाण्याचा निर्णय घेणार, याबाबत अजूनही संभ्रम आहे.

अजित पवार यांच्या आधीपासूनच सुरू होत्या हालचाली?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी सत्तास्थापनेची चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी आधीही नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार यांचा पहिल्या दिवसापासून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या संयुक्त सरकारला विरोध होता. यामध्ये धनंजय मुंडे, सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल हेदेखील अजित पवारांच्या भूमिकेसोबत होते, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात अजित पवारांनंतर हे इतर नेते काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शरद पवार नाराज

‘अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे,’ असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी फुटली, हे आता स्पष्ट झालं आहे.

भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या मदतीने त्यांनी हे सरकार स्थापन केलं आहे. अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

या सगळ्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीकडून फक्त अजित पवार कुटुंब दिसलं आहे. राष्ट्रवादीचे इतर कोणतेही नेते किंवा स्वत: शरद पवार हे यावेळी कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीतला एक मोठा गट फोडून अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जेव्हा या सगळ्या घटनाक्रमाबद्दल प्रतिक्रिया देतील, तेव्हाच याबाबतची स्पष्ट होऊ शकणार आहे.

अजित पवारांनी दिली माहिती

महिनाभर नुसतं चर्चेचं गुऱ्हार चालू होतं मात्र त्यामधून कोणताही तोडगा निघत नव्हता. त्यामुळे स्थिर सरकार स्थापन कसं होणार हा प्रश्न होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी जो माझ्यावर विश्वास दाखवून मला जी जबाबदारी दिली आहे ती निश्चितपणे चांगल्यापद्धतीनं पार पाडण्याचा प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.