विदर्भाच्या विद्यार्थ्यांना दोनदा द्यावी लागेल एमएचटी-सीईटी?

एमएचटी-सीईटी

नागपूर : एमएचटी-सीईटीच्या तारखा घोषित होताच विद्यार्थ्यांची चिंता कमी होण्याऐवजी अधिकच वाढली आहे. ही चिंता परीक्षेची नाही तर परीक्षा नियोजनाची आहे. ही

सीईटी सेलने एमएचटी-सीईटीचे आयोजन दोन टप्प्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्याअंतर्गत १ ते ९ ऑक्टोबरदरम्यान फिजिक्स, केमिस्ट्री व बॉयोलॉजी (पीसीबी) साठी आवेदन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीईटीचे आयोजन होईल. दुसऱ्या टप्प्यात १२ ते २० ऑक्टोबरदरम्यान फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथ्स (पीसीएम) साठी आवेदन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीईटीचे आयोजन केले जाणार आहे. विदर्भातील बहुतेक विद्यार्थी दोन्ही अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा देतात. पूर्वी पीसीबी व पीसीएमची परीक्षा एकाच दिवशी होत होती आणि केवळ अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थी फिजिक्स व केमिस्ट्रीचा पेपर देत होते. दुसऱ्या सत्रात गणिताचा पेपर होत होता. फार्मसीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी पीसीबीचा पेपर देत होते. त्यांना गणिताचा पेपर देण्याची गरज नव्हती. दोन्ही अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच गणिताचा पेपर द्यावा लागत होता.

गुरुवारी घोषित परिपत्रकानुसार, सीईटी सेलने पीसीबी व पीसीएमचा पेपर वेगवेगळ्या चरणात घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे पीसीबीनंतर दुसऱ्यांदा पीसीएमचा पेपर द्यावा लागणार का, असा पश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे. मात्र सीईटी सेलकडून याबाबत सध्यातरी कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. याबाबत तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, आपली भूमिका परीक्षेत सहकार्य करण्याची असून बाकी कार्य सीईटी सेलचे असल्याचे स्पष्ट केले. मात्र विद्यार्थ्यांना चिंता करण्याची गरज नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत सीईटी सेलकडून सविस्तर दिशानिर्देश जाहीर होणार असून विद्यार्थ्यांनी सेलच्या वेबसाईटवर चौकशी करीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.