कोरोना रुग्णांची रुग्णवाहिकेसाठी अगतिक धडपड; कुणाचे डिझेल संपले तर कुणाला हवी डॉक्टरची चिठ्ठी

रुग्णवाहिका

नागपूर : कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी महापालिकेने ६५ रुग्णवाहिकांचा ताफा उभा केला. प्रत्येक झोनमध्ये चार रुग्णवाहिका दिल्या. परंतु जेव्हा रुग्णवाहिकेसाठी संबंधित झोनला फोन केला तेव्हा अनेकांनी थेट रुग्णवाहिका चालकांचे मोबाईल नंबर दिले. यातील काहींचे नंबर मुके होते, ज्यांचे सुरू होते त्यांनी डॉक्टरांच्या पत्राशिवाय रुग्णवाहिका येणार नाही, असे म्हणून हात वर केले, काहींनी डिझेल नसल्याचे, काहींनी सॅनिटायझर नसल्याचे तर काहींनी डॉक्टरांचा फोन आल्यावरच येणार असे सांगितले. एकाने चक्क ऑटोने घेऊन जाण्याचा सल्लाही दिला. यावरून महापालिके चा रुग्णवाहिकेचा बोजवारा उडाला असून, रुग्णवाहिके चा फायदा कुणाला, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना रुग्णवाहिकांची कमतरता लक्षात घेऊन महापालिकेने भाडेतत्त्वावर रुग्णवाहिका रुग्णसेवेत रुजू के ल्या. पूर्वी मनपाकडे २० रुग्णवाहिका होत्या. मागील आठवड्यात त्यांची संख्या वाढवून ४० करण्यात आली. बुधवारी पुन्हा २५ रुग्णवाहिकांची भर पडली. आता मनपाकडे एकूण ६५ रुग्णवाहिका आहेत. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी हिरवी झेंडी दाखवून रुग्णवाहिकेचा शुभारंभ के ला. परंतु उद्घाटनानंतर गुरुवारी सायंकाळी दहाही झोनला ‘लोकमत’ प्रतिनिधीने फोन लावल्यावर मंगळवारी झोन वगळता प्रत्येकाने टाळण्याचाच प्रयत्न केल्याचे वास्तव समोर आले.

-लक्ष्मीनगर झोनचा नंबर व्यस्त, धरमपेठ झोनने सांगितला एक तासाचा वेळ
लक्ष्मीनगर झोनचा ०७१२-२२४५०५३ हा फोन नंबर अनेक तासांपासून व्यस्त असल्याचे आढळून आले. धरमपेठ झोनच्या ०७१२-२५६७०५६ या क्रमांकावर फोन के ल्यावर तेथील कर्मचाऱ्याने थेट रुग्णवाहिकेचा मोबाईल नंबर दिला. रुग्णवाहिका चालकाला फोन केल्यावर आता ड्रायव्हर नाही, एका तासाने येईल, त्या पेक्षा ऑटोरिक्षाने घेऊन जाण्याचा सल्ला देऊन फोन कापला.

-हनुमाननगर व धंतोली झोनच्या चालकाने घेतले आढेवेढे
हनुमाननगर झोनच्या ०७१२-२७५५५८९ या क्रमांकावर फोन के ल्यावर नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहून घेण्यास वेळ लावला. त्यानंतर एका रुग्णवाहिकेचा नंबर दिला. त्या नंबरवर रिंग जात नव्हती. धंतोली झोनच्या ०७१२-२४६५५९९ वर फोन केल्यावर त्यांनीही माहिती लिहून घेत रुग्णवाहिकेचा नंबर दिला. रुग्णवाहिका चालकाला फोन के ल्यावर कुठे यायचे असे न विचारता कुठे जायचे, तिथे खाट आहे का, रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आहे का, रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलिंडर व डॉक्टर नसल्याचे सांगत आढेवेढे घेत फोन कापला.

-नेहरूनगर झोन म्हणते, हा कंट्रोल रूमचा नंबर
नेहरूनगर झोनच्या ०७१२-२७०२१२६ या क्रमांकावर फोन के ल्यावर हा कंट्रोल रूमचा नंबर आहे, असे सांगून फोन कापला. पुन्हा फोन के ल्यावर येथे रुग्णवाहिका नाही, असेही उत्तर मिळाले.

-गांधीबाग झोनला हवे डॉक्टरांचे पत्र
गांधीबाग झोनच्या ०७१२-२७३९८३२ क्रमांकावर फोन केल्यावर त्यांनी थेट तीन वेगवेगळ्या रुग्णवाहिकांचे मोबाईल नंबर देऊन हात वर के ले. यातील दोघांचे फोन लागले नाहीत, एकाचा फोन लागल्यावर त्याने डॉक्टरांचे पत्र मिळाल्यावरच रुग्णवाहिका येईल, असे सांगून फोन बंद केला.

-लकडगंज झोनच्या रुग्णवाहिकेत डिझेलच नाही
लकडगंज झोनच्या ०७१२-२७३७५९९ या क्रमांकावर फोन के ल्यावर संबंधितांनी रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे कारण सांगून मनपाच्या कंट्रोल रूमला फोन करण्यास सांगितले. सतरंजीपुरा झोनला फोन के ल्यावर तेथील कर्मचाऱ्याने एका अधिकाऱ्याचा नंबर दिला. त्यांना फोन के ल्यावर अधिकाऱ्याने झोनमध्ये येऊन रुग्णवाहिका घेऊन जाण्याचा सल्ला दिला. थोड्या वेळाने त्याच अधिकाऱ्याने रुग्णवाहिका चालकाचा फोन आला होता का, अशी विचारणाही के ली.

-आसीनगर झोनच्या रुग्णवाहिका चालकाला हवे सॅनिटायझर
आसीनगर झोनच्या ०७१२-२६५५६०५ या कमांकावर फोन केल्यावर संबंधित कर्मचाऱ्याने रुग्णावाहिका चालकाचा नंबर दिला, तो पत्त्यावर येतोही म्हणाला, पण माझ्याकडे सॅनिटायझर नाही, पीपीई किटही नसल्याचे सांगत आपली कैफियत मांडली.

-मंगळवारी झोनने दिला मदतीचा हात!
मंगळवारी झोनच्या ०७१२-२५९९९०५ या क्रमांकावर फोन केल्यावर दोन रुग्णवाहिकांचे मोबाईल नंबर दिले. एक लागला नाही, मात्र नीलेश मंडपे रुग्णवाहिका चालकाचा फोन लागला. त्याने आढेवेढे न घेता थेट पत्ता विचारत १० मिनिटात पोहचतो म्हणून सांगितले. विशेष म्हणजे, रुग्णवाहिका मिळाली का, याचीही विचारपूस झोनमधून झाली.