राहत्या घरी सापडला पत्नीचा मृतदेह, मुंबईत प्रसिद्ध यूट्यूबर Jeetu Jaan याला अटक

राहत्या घरी सापडला पत्नीचा मृतदेह, मुंबईत प्रसिद्ध यूट्यूबर Jeetu Jaan याला अटक

मुंबई : पत्नीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी मुंबईत प्रसिद्ध यूट्यूबरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पत्नी कोमल अगरवाल हिची हत्या पती जितेंद्रने केल्याचा आरोप कोमलच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. त्यानंतर भांडुप पोलिसांनी आरोपी पती जितेंद्र अगरवाल उर्फ जितू जान (Jeetu Jaan) याला अटक केली.

पत्नी राहत्या घरी मृतावस्थेत                                                                                                  कोमल अगरवाल हिचा मृतदेह राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले होते. पोलिसांनी आधी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र कोमलची आई आणि बहीण यांच्या तक्रारीनंतर कलम 304 (सदोष मनुष्यवध), 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) 323 आणि 506 अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

तीन महिन्यांपूर्वीच लग्न                                                                                                          मयत कोमल अगरवाल आणि आरोपी जितेंद्र अगरवाल उर्फ जितू जान (Jeetu Jaan) यांची अवघ्या काही महिन्यांपूर्वीच ओळख झाली होती. त्यानंतर 4 मार्चला दोघं घरातून पळून गेले. कोमलच्या कुटुंबीयांच्या मर्जीविरोधात त्यांनी लग्न केलं. मात्र जितेंद्र पत्नीला दररोज मारहाण करायचा, असा आरोप कोमलच्या आईने केला आहे. कोमलने बहीण प्रियाकडे याबाबत वाच्यता केल्याचं समजल्यावर जितेंद्रने तिला बहिणीशी फोनवर बोलण्यास मनाई केली, असाही दावा केला जात आहे. कोमल एकदा घर सोडूनही निघून गेल्याचं बोललं जातं.

कोमलच्या कुटुंबीयांचा आरोप                                                                                                    जितेंद्र जर तिला वारंवार शारीरिक त्रास देत होता, तर त्याने तिची हत्या केल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं कोमलच्या बहिणीचं म्हणणं आहे. पोलिसांनी माहिती दिल्यानंतर कोमलच्या कुटुंबीयांना तिच्या मृत्यूबद्दल समजलं होतं. त्यांनी तात्काळ तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचं बोलून दाखवलं होतं.

दरम्यान, आरोपी जितेंद्र अगरवालला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ऑटोप्सी रिपोर्टनंतरच कोमलने स्वतः गळफास घेतला, की तिची हत्या करण्यात आली, हे स्पष्ट होणार आहे.