पत्नीची हत्या, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर

नागपूर : अनैतिक संबंधातून गर्भवती झाल्याच्या संशयातून पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर झोपेच्या गोळ्या घेऊन पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना झिंगाबाई टाकळातील मानवतानगर भागात उघडकीस आली. दीपाली योगेश राऊत (वय ३०), असे मृत पत्नीचे तर योगेश नत्थू राऊत (वय ३०), असे पतीचे नाव आहे. योगेश याच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. दीपाली ही एसटीमध्ये वाहक होती. ती पांढरकवडा येथे तैनात होती. योगेश हा वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) आहे.

डिसेंबर २०१८ मध्ये दोघांचे लग्न झाले. सुटीच्या दिवशी दीपाली ही नागपुरात येत होती. दरम्यान ती सहा महिन्याची गर्भवती असल्याचे योगेश याला कळाले. अनैतिक संबंधातून तिला गर्भधारणा झाल्याचा संशय योगेश याला होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद होत होते. ११ मे रोजी योगेश याने दोरीने गळा आवळून दीपालीची हत्या केली. त्यानंतर झोपेच्या गोळ्या घेतल्या. योगेश याच्या खोलीचा दरवाजा बंद होता. तो बाहेर न निघाल्याने त्याच्या वडिलांनी आवाज दिला. योगेश याने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच बेशुद्ध होऊन योगेश खाली कोसळला. नत्थू यांनी खोलीत बघितले असता दीपालीही बेशुद्ध होती. शेजाऱ्यांच्या मदतीने नत्थू यांनी दोघांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून दीपालीला मृत घोषित केले. येथील डॉक्टरांनी योगेश याच्यावर उपचार करून त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर योगेश याला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. दीपालीचे वडील अशोक होरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी योगेश याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. मानकापूरचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मत्ते या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

अधिक वाचा : इडली सांबार में निकली चिपकली, 2 बीमार