भरघोस गुणांचा प्रवेशांवर परिणाम नाही

नागपूर : यंदाच्या सीबीएसई दहावी परीक्षेत भरघोस गुण कमावणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी त्याचा अकरावी प्रवेशांवर थेट परिणाम होणार नाही. नागपूर शहर आणि जिल्ह्यात विविध ज्युनियर कॉलेजेसमध्ये विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत पुरेशा जागा आहेत. त्यामुळे, सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात अडचणी येणार नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत विद्यार्थ्यांना भरघोस गुण मिळाले आहेत. ९० टक्क्यांच्या वर गुण मिळविणाऱ्यांची संख्या प्रत्येक शाळेत मोठी आहे. समान गुण कमावणारे अनेक विद्यार्थी आहेत. दहावीची परीक्षा सीबीएसईमधून दिली तरी अकरावी आणि बारावीसाठी महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमांची निवड बहुतांश विद्यार्थी करीत असतात. राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबविणारे अनेक ज्युनियर कॉलेजेस नागपुरात आणि जिल्ह्यात आहे. या कॉलेजेसमधील प्रवेशांसाठी केंद्रीय प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. सीबीएसईतून दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना याच प्रवेशप्रक्रियेतून अकरावीत प्रवेश घ्यावा लागतो.

सीबीएसईचे विद्यार्थी या प्रवेशप्रक्रियेत सहभागी होत असल्याने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्याशी स्पर्धा करावी लागते. ही स्पर्धा समान पातळीवर आणण्यासाठी बेस्ट ऑफ फाइव्हचा नियम लावण्यात आला आहे. यंदाच्या परीक्षेत सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना भरपूर गुण मिळाल्याने ही स्पर्धा मोठी राहणार आहे. या स्पर्धेपायी राज्य मंडळातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी संधी उपलब्ध राहतील, अशी शंकाही पालक आणि विद्यार्थ्यांमधून उपस्थित केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात असे होणार नसल्याचे चित्र आहे.

परिस्थिती बदलू लागली

कोणत्याही एका कॉलेजसाठी विद्यार्थ्यांचा आग्रह असल्याची परिस्थिती हळूहळू बदलते आहे. ऑनलाइन पद्धतीने विविध कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश होत आहेत. या कॉलेजेसमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक कॉलेजेसमधील सर्व जागा भरत नसल्याबद्दलही ओरड होते आहे. त्यामुळे, राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यात अडचणी येणार नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

अधिक वाचा : भारताच्या ‘या’ निर्णयामुळे पाकचे धाबे दणाणणार

Comments

comments