कोलकाता: देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल २ मे रोजी लागले. सर्वांचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपला पराभवाचा मोठा धक्का दिला. देशभरातून ममता बॅनर्जींना शुभेच्छा दिल्या जात असून, भाजपला टक्कर देणारा नवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची ५ मे रोजी शपथ घेणार आहेत.
पश्चिम बंगालची निवडणूक तृणमूल काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली होती. मात्र, बंगाली जनतेने भाजपला नाकारत ममता बॅनर्जी यांच्या पदरात मतांचे दान टाकले. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवला आणि तृणमूलने भाजपला रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. त्यानंतर आता ५ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय झाला आहे. ५ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, ६ मे रोजी सर्व आमदारांचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पार्थ चॅटर्जी यांनी सांगितले. शपथविधी प्रसंगी कोणताही मोठा समारोह होणार नाही, राज्यापाल व सर्व आमदारांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडणार आहे. याप्रसंगी त्यांच्या मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्री देखील शपथ घेण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
कोणीही विजयी रॅली काढू नका
ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. कोरोनाची गंभीर परिस्थिती असल्याने कोणीही विजयी रॅली काढू नये, जल्लोष करू नये, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी सर्व आमदार, नेते, कार्यकर्त्यांना यावेळी केले आहे.
दरम्यान, देशातील पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ या राज्यांसह पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी २ मे रोजी झाली. सर्वांचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरले असून, राजकीय वर्तुळात भाजपच्या यातच पराभवाची जोरदार चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.