`लॉकडाऊन` 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यास उद्धव ठाकरेंची तयारी

Udhav-Thackray-Modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉक डाउन वाढवण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत असून ३० एप्रिलपर्यंत निर्बंध लागू राहतील अशी शक्यता आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्याला आर्थिक मदत दिली जावी, अशी मागणी नरेंद्र मोदींकडे केली असल्याचंही कळत आहे.

सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी जवळपास तशीच तयारी दाखवली आहे. जागतिक आरोग्य संघटेनेने अचानक लॉक डाऊन शिथिल करणे हे धोकादायक ठरू शकेल, असा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबई शहरात ही संख्या वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लॉक डाऊन वाढेल, असा अंदाज व्यक्त होत होता. तशीच मागणी ठाकरे यांनी आज मोदी यांच्याकडे केली.

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून शुक्रवारी राज्यात 210 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या एक हजार 574 वर जाऊन पोचली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

त्याशिवाय राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये 13 रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, आतापर्यंत राज्यात 188 बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मुंबई येथील दहा, तर पुण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. आज झालेल्या 13 मृत्यूपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत, तर 5 रुग्ण हे वय 40 ते 60 वर्षे या वयोगटातील आहेत;

तर दोघेजण 40 वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्युमुखी पडलेल्या 11 रुग्णांमध्ये (85 %) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यींची संख्या आता 110 झाली आहे.

आजपर्यंत तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या 33093 नमुन्यांपैकी 30477 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत; तर 1574 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 188 कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 38927 व्यक्ती घरगुती विलगीकरण असून 4738 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्‍लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्‍लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण चार हजार 374 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी साडेसोळा लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

Also Read- इतवारी बाजारपेठ परिसरही सील