इतवारी बाजारपेठ परिसरही सील

सतरंजीपुरा परिसरात करोनाबाधिताचा मृत्यू व इतर सहाजण पॉझिटिव्ह आढळल्याचा पार्श्वभूमीवर इतवारी बाजारपेठेत खबरदारीची उपाययोजना करण्यात आली आहे. या बाजारात खरेदीसाठी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात झुंबड उडत होती.

Itawari Market

नागपूर: सतरंजीपुरा परिसरात करोनाबाधिताचा मृत्यू व इतर सहाजण पॉझिटिव्ह आढळल्याचा पार्श्वभूमीवर इतवारी बाजारपेठेत खबरदारीची उपाययोजना करण्यात आली आहे. या बाजारात खरेदीसाठी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात झुंबड उडत होती. शिवाय, या दोन्ही परिसरांतील छोट्या-मोठ्या गल्ल्यांतूनही गर्दी वाढत असल्याने परिसरातील व्यापारी, नागरिकांनी पुढाकार घेत परिसर सील केला. पोलिसांना याबाबत विनंती करण्यात आली.

मनपाच्या आरोग्य विभागाने गुरुवारी रात्रीच या परिसरात सर्वेक्षण करीत फवारणी व निर्जंतुकीकरणही केले. शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने या भागात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी कमी होत नव्हती. रस्त्यांवर असलेल्या पोलिसांनाही गर्दी जुमानत नव्हती. त्यातच करोनाचे रुग्ण वाढल्याने बाजारपेठेत भीतीचे वातावरण वाढले.

त्यामुळे या भागातील नागरिकांनी पुढाकार घेतला. येथील नगरसेविका आभा पांडे व इतरांनी पोलिसांकडे गल्लीतील रस्ताही बंद करण्याची विनंती केली. अनेकांनी स्वत:हून गल्लीतील रस्ता बंद केला. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव यास सहमती दर्शविली. त्यांनी या परिसराला सील करण्याची विनंती केली. केवळ आरोग्य विभागाचे कर्मचारी तेवढे परिसरात सर्वेक्षणासाठी फिरताना दिसत आहे.

इतवारी, सतरंजीपुरा, दलालपुरा, नेहरू पुतळा परिसर, तेलीपुरा, मस्कासाथ, परवारपुरा, इतवारी मिरची बाजार व आसपासच्या परिसरातून जाणाऱ्या छोट्या-मोठ्या रस्त्यांवर बॅरिकेड्स ठेवण्यात आले. अनेक गल्ल्यांमध्ये तर आडवे दांडे बांण्यात आले. कुठल्याही दुचाकींना गल्लीतून जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

संशयित मोकाट फिरत असल्याची तक्रार

सतरंजीपुरा भागातील करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेली एक व्यक्ती परिसरात मोकाट फिरत असल्याची तक्रार मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे करण्यात आली. ही व्यक्ती दलालपुरा भागातील असून, ती मृत व्यक्तीला घरी व मेयोतही जाऊन भेटल्याची माहिती देण्यात आली आहे. आता या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.

Also Read- Corona Virus in Nagpur; नागपुरातील फार्मा युनिटमध्ये कोविड-१९ चे औषध; ‘फ्लाविपिरॅव्हिर’ वर चाचण्या सुरू