एक लाखाच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण

Kidnapping of young man for ransom
Young man kidnapped for ransom

नागपूर:  सेंट्रिंगचे काम करणाऱ्या युवकाचे एक लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. पाचपावली पोलिसांनी वेळीच सापळा रचून युवकाची सुटका करीत तीन महिलांसह सात जणांना अटक केल्याने अनर्थ टळला. अटकेतील आरोपींमध्ये सूत्रधार सावकाराचाही समावेश आहे. रचना विलास पराते, श्रीमती सोमू दीपक चक्रधर, रसिका राजेश हाटे, राजा ऊर्फ संग्राम अशोक पाटील, गणेश दशरथ निनावे ,गौरव सूर्यकांत ढवळे व सूत्रधार निर्मलकर, अशी अटकेतील अपहरणकर्त्यांची नावे आहेत. संजय चंद्रू शाहू (वय २६,रा. विजयनगर),असे युवकाचे नाव आहे.

संजय हा सेंट्रिगचे काम करतो. निर्मलकर हा व्याजाने पैसे देतो. त्याने रचना व अन्य साथीदाराच्या मदतीने संजय याचे अपहरण करुन एक लाखाची खंडणी मागण्याचा कट आखला. संजयचा मित्र माझ्याकडून व्याजाने पैसे घेईल, हे त्याला ठावूक होते, त्यामुळेच त्याने हा कट आखल्याचे पोलिसांनी सांगितले. २२ जुलैला रचनाने संजयला कमाल चौक येथे बोलाविले. तेथून दोघे सीताबर्डी येथे आले. सीताबर्डीतून तिने संजयला वडधामना भागात नेले. येथे तिचे अन्य साथीदार कारमध्ये होते. संजयला बळजबरीने तिने कारमध्ये बसविले. सहा जणांनी संजयचे अपहरण केले. त्यानंतर अपरहणकर्त्यांनी संजयचा मित्र शेख हमीद याच्या मोबाइलवर संपर्क साधून एक लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे घेऊन हमीदला अग्रसेन चौकात बोलाविले.

हमीदने पाचपावली पोलिसांना घटनेची माहिती दिली. युवकाचे अपहरण झाल्याचे कळताच पोलिसांमध्ये खळबळ उडाली. पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम, उपनिरीक्षक गोडबोले, रामटेके, हेडकॉन्स्टेबल विजय यादव, राजेश देशमुख, अनिरुद्ध मेश्राम, चिंतामण डाखोरे, सुरेखा, महेश जाधव, विजय माने, विनोद व सुमित यांनी अपहरकर्त्यांचा शोध घेतला. पाठलाग करून पोलिसांनी अपहरकर्त्यांना अटक केली व संजयची सुटका केली.

मेट्रो कर्मचाऱ्याच्या वेषात रचला सापळा

अपहरणकर्त्यांनी अग्रसेन चौकात पैसे घेऊन बोलाविल्याचे हमीदने पोलिसांना सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम व त्यांचे सहकारी साध्या गणवेशात अग्रसेन चौकात पोहोचले. पोलिसांनी मेट्रो रेल्वेच्या गार्डचे जॅकेट व हेल्मेट घातले. त्यामुळे पोलिस हे मेट्रोचेच कर्मचारी असल्याचे भासत होते अग्रसेन चौकात रचना, सोमू व रसिका पैसे घेण्यासाठी आले. पोलिसांनी तिघींना ताब्यात घेतले. त्यानंतर पाठलाग करून अन्य अपहरणकर्त्यांना अटक केली. गुरुवारी रात्री पोलिसांनी सूत्रधार निर्मलकर यालाही अटक केली.