अंबाझरीत केवळ गाळ शिल्लक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पाणीपुरठा केला बंद

Ambazari Lake
Ambazari Lake

नागपूर:  पाणीटंचाई लक्षात घेता अंबाझरीचे पाणी या दुष्काळात पिण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. हे पाणी शुद्ध करून डिफेन्स, वाडी आणि दवलामेटी या भागातील नागरिकांना देण्यात आले. मात्र, आता अंबाझरीतही केवळ गाळ शिल्लक असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पाणीपुरठा बंद केला आहे.

जलसंकट लक्षात घेता अंबाझरी तलावातील पाण्याचा पुन्हा पिण्यासाठी वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. डिफेन्स, वाडी आणि दवलामेटी या भागांना पाणी देण्यासाठी तीन महिन्यांचा करार करण्यात आला होता. ८ दशलक्ष घनमीटर क्षमता असलेल्या अंबाझरी तलावातील पाणी पूर्वी पिण्यासाठी वापरण्यात येत होते. दिवसाला १० एमएलडी पाणी वापरण्यात आले. हे पाणी डिफेन्ससाठी ७ एमएलडी, वाडीसाठी २ एमएलडी आणि दवलामेटीसाठी १ एमएलडी असे वापरण्यात आले. अंबाझरीच्या पाण्यामुळे १५ हजार कुटुंबांची तहान भागविण्यात आली. महिनाभरात ०.७५ दशलक्ष घनमीटर पाणी लागेल. दोन महिने पाणी वापरले तर दीड दशलक्ष घनमीटर पाणी लागेल, असे जीवन प्राधिकरण कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. मात्र, आता तलावात काही पाणी दिसत असले तरी त्याखाली पूर्ण गाळ असल्याने अंबाझरीचे पाणी वापरणे शक्य नसल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

पम्प फसले गाळात

वाडी नगरपरिषदेचे ७ हजार ५०० ग्राहक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे २२००, देवलामेटीचे २१००, डिफेन्समधील ३ हजार कुटुंबांना आतापर्यंत अंबाझरीचे पाणी वितरित करण्यात आले. मात्र, आता ज्या पाइपच्या माध्यमातून पाणी वितरित करण्यात येत होते, ते पाइप गाळात फसले असल्याने पाणी काढणे बंद झाले आहे.

वेणा धरणाचा आधार

डिफेन्स, वाडी आणि दवलामेटी या भागांना आता वेणा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वेणा धरणाची पातळी तीन फुटांनी वाढल्याने या धरणातून आता पाणी दिले जात आहे. वेणामधून १२ मिलियन लिटर पाणी दिले जात असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

अधिक वाचा : वेस्टर्न कोलफिल्ड्स मधील कोळसा खाणीत भ्रष्टाचार; अधिकाऱ्यांना निलंबित करा