विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले! २१ ऑक्टोबरला मतदान २४ ला निकाल

Maharashtra-election-2019

मुंबई: अखेर आज राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले.केंद्रिय निवडणुक आयोगाने आज दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. या घोषणेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.राज्यातील २८८ जागांसाठी येत्या २१ ऑक्टोबरला मतदान आणि २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी केली आहे. संपूर्ण राज्यासाठी एकाच टप्प्यात हे मतदान होणार आहे.त्यामुळे निवडणुकीसाठी आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.विधानसभेच्या निवडणुकीसोबत साता-यातील लोकसभेची पोटनिवडणुक होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र विधानसभेची मुदत ८ नोव्हेंबरला संपत असल्यामुळे महाराष्ट्र आता १३ व्या विधानसभेला निरोप देऊन १४ व्या विधानसभेला सामोरे जाणार आहे.गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले होते. अखेर त्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.आज जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार राज्यात विधानसभेसाठी येत्या २१ ऑक्टोबरला मतदान, तर २४ ऑक्टेबरला मतमोजणी होणार आहे. संपूर्ण राज्यासाठी एकाच टप्प्यात हे मतदान होणार आहे. ४ ऑक्टेबर ही अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख आहे. तर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर आहे. २१ ऑक्टोबरला मतदान होऊन दिवाळीपूर्वी म्हणजे २४ तारखेला निकाल लागणार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीसोबत साता-यामध्ये लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार नाही. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना येत्या २७ सप्टेंबरला जारी केली जाणार असल्याने दिवाळीपूर्वी राज्यात नवे सरकार येईल.

राज्यात विधानसभेसाठी ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ पेक्षा जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुक खर्चावर निवडणूक आयोग लक्ष ठेवून असणार आहे, तसेच २७ सप्टेंबरला निवडणुकीची अधिसूचना निघणार आहे. प्रत्येक उमेदवारांनी आपले अर्ज भरताना संपूर्ण रकाने भरणे बंधनकारक आहे असेही सुनिल अरोरा म्हणाले. तसेच मतदार याद्यांमध्ये होणारा घोळ टाळण्यासाठी अखेरच्या दिवसापर्यंत मतदारांची नोंदणी केली जाणार असून यासाठी विशेष मोहिम राबवली जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम:

अधिसूचना- २७ सप्टेंबर

अर्ज भरण्याची शेवटची तारिख ४ ऑक्टोबर

अर्ज छानणी – ५ ऑक्टोबर

अर्ज मागे घेणे – ७ ऑक्टोबर

मतदान – २१ ऑक्टोबर

मतमोजणी – २४ ऑक्टोबर

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे दहा लाख मतदारांची वाढ झाली असल्याचे निवडणूक आयोगाची आकडेवारी सांगते.निवडणूक आयोगाने १५ जुलै ते ३१ ऑगस्टदरम्यान मतदार दुरुस्ती याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम राबवला होता. यातून ही माहिती पुढे आली आहे. निवडणूक आयोग नियमितपणे मतदार दुरुस्ती याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम हाती घेत असते. यानुसार राबवलेल्या उपक्रमात ऑगस्ट अखेर ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ इतके पात्र मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेला दहा लाखांपेक्षा जास्त मतदारांची संख्या झाली आहे. यात चार कोटी ६७ लाख ३७ हजार ८४१ पुरुष तर चार कोटी २७ लाख पाच हजार ७७७ लाख महिला मतदार आहेत. २५९३ तृतीय पंथी मतदार आहेत.या निवडणुकीच्या मतदानासाठी सुमारे १ लाख ८ हजार मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे.

२०१४ मध्ये विधानसभेसाठी १५ ऑक्टोबर २०१४ रोजी राज्यामध्ये एकाच फेरीत मतदान घेतले गेले होते. ह्या निवडणुकीमधून महाराष्ट्र विधानसभेमधील सर्व २८८ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. १९ ऑक्टोबर २०१४ रोजी मतमोजणी व निवडणुकीचे निकाल घोषित केले गेले. यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक १२२ जागा मिळाल्या. शिवसेनेस ६३, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या.