भारतात ‘बुरखा’, ‘नकाब’वर बंदी घाला : उद्धव ठाकरे यांची मागणी

नागपूर : श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून पंतप्रधान मोदी यांनीही भारतात ‘बुरखा’ आणि ‘नकाब’वर बंदी घालावी अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. ‘सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस व धैर्याचे दर्शन घडवले असे सांगताना, रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? पंतप्रधान मोदी आज अयोध्येला निघाले आहेत, म्हणूनच हा प्रश्न’, असा थेट सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे.

कठोर पावले कधी उचलणार ?

ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात ही मागणी केली आहे. दहशतवादाविरोधात कठोर पावले उचण्याबाबत सतत बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्धव ठाकरे यांनी दहशतवादाविरोधात श्रीलंकेने उचलली तशी कठोर पावले कधी उचलणार असा सवाल केला आहे. श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांचा हवाला देत ठाकरे यांनी काश्मीरमधील दहशतवादाचा मुद्दाही अधोरेखित केला आहे. भारताचा जम्मू आणि कश्मीर प्रांत त्याच इस्लामी दहशतवादाने त्रस्त आणि जर्जर झाला आहे, असे म्हणत श्रीलंका, फ्रान्स, न्यूझीलंड आणि ब्रिटनसारखी राष्ट्रे जी कठोर पावले उचलतात तशी पावले आपण कधी उचलणार?, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

विद्यमान सरकारने ‘ट्रिपल तलाक’विरोधात कायदा करून पीडित मुस्लिम महिलांचे शोषण वगैरे थांबवले हे मान्य करताना, भीषण बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणार्‍या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे, याकडेही उद्धव यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे.

मोदींनी हे सर्व करून घेतले पाहिजे.

भारतातील मुस्लीम समाजावर भाष्य करताना उद्धव यांनी ‘राष्ट्र नंतर, आधी धर्म’ हा मुसलमान समाजाचा प्राधान्यक्रम असल्याचे म्हटले आहे. इस्लाम धर्म देखील फालतू रूढी-परंपरांच्या बेड्यात अडकलेला आहे असे सांगत मुसलमानांत कोणी फुले, शाहू निर्माण झाले नाहीत. किंबहुना होऊ दिले गेले नाहीत असेही उद्धव यांनी अग्रलेखात म्हटले आहे. याच कारणांमुळे शहाबुद्दीन, आझम खान, ओवेसी बंधू व अबू आझमी यांचे फावले असल्याचे उद्धव यांनी म्हटले आहे. उद्धव यांनी अग्रलेखात या नेत्यांचा ‘धर्मांध’, ‘माथेफिरू’ असा उल्लेख केला आहे. ‘ही धर्मांधता व त्यांच्यातील रूढी, परंपरा राष्ट्रीय सुरक्षेच्या आड येत असतील तर त्या मोडून काढल्या पाहिजेत. मोदी यांनी हे सर्व करून घेतले पाहिजे’, असे आवाहन त्यांनी पंतप्रधानांना केले आहे. सर्जिकल स्ट्राइकइतकेच हे कार्य धाडसाचे असल्याचेही ते म्हणाले.

आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

१) फ्रान्समध्येही दहशतवादी हल्ला होताच तेथील सरकारने बुरखा बंदी केली. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात व ब्रिटनमध्येही हेच घडले आहे. मग याबाबतीत भारत मागे का?

२) तुर्कस्तान हे तसे इस्लाम मानणारे राष्ट्र, पण केमाल पाशाला बुरख्याआड काही घडत असल्याचा संशय येताच त्याने त्याच्या देशात मुसलमानी तरुणांची दाढी व बुरख्यांवर बंदी आणलीच होती.

३) बुरख्याचा इस्लामशी काडीमात्र संबंध नाही व हिंदुस्थानातील मुसलमान अरबस्तानातील समाजव्यवस्थेचे अनुकरण करीत आहेत.

४) ट्रिपल तलाक आणि बुरखा बंदीविरोधात कोणी आवाज उठवला तर इस्लाम संकटात आल्याची बांग मारली जाते. खरे म्हणजे मुसलमानांना त्यांचाच धर्म नीट समजलेला नाही असाच त्याचा अर्थ. (अर्थात काही हिंदूंच्या बाबतीतही तेच म्हणावे लागेल.)

अधिक वाचा : कपिल देवच्या लुकमध्ये ‘असा’ दिसतोय रणवीर