Satish Uke : नाना पटोलेंचे वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीचा छापा

नागपूर: नागपूर येथील वकील सतीश उके (Satish Uke) यांच्या घरावर ईडीने छापा टाकला असल्याचे वृत्त आहे. याआधी सतीश उके यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. यामुळे ते चर्चेत आले होते. फडणवीस यांच्या विरोधातील याचिकेत सतीश उके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची बाजू मांडली होती. सतीश उके यांच्या नागपूर येथील घराची ईडीकडून झाडाझडती सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खोटे शपथपत्र दाखल करून यश मिळविल्याचा आरोप याआधी नाना पटोले यांनी केली होता. याबाबत त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल केला होता. नाना पटोले यांनी या प्रकरणात अॅड. सतीष उके (Satish Uke) यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता. या शपथपत्रात गडकरींनी आपली संपत्ती, उत्पन्न तसेच वैयक्तिक माहिती चुकीची दिल्याने मतदारांची दिशाभूल झाल्याचा दावा केला होता.

जमीन गैरव्यवहार प्रकरणातही उके रडारवर आहेत. त्यांच्या घरी ईडीची झाडाझडती सुरु आहे. या दरम्यान उके यांच्या घरासमोर सीआरपीएफचं पथक तैनात करण्यात आले आहे.