ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतनही आता थेट बँक खात्यात : पंकजा मुंडे

ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाने घेतली विधानभवनात भेट

नागपूर : राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाने आज ना. पंकजाताई मुंडे यांची नागपूर येथील त्यांच्या विधान भवनातील दालनात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भेट घेतली त्यावेळी त्यांनी ही माहिती सांगितली.

मंत्री मुंडे म्हणाल्या की,ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विलंबाने वेतन मिळत होते. ते आता आँनलाइन करुन थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याने त्यांना आता वेळेत वेतन मिळणे शक्य होणार आहे. ग्रामपंचायत कर्मचा-यांना त्यांच्या पात्रतेनुसार वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचा-यांइतके वेतन देण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने नियुक्त केलेल्या समितीचा आहवाल लवकरच मागविण्यात येईल. त्यानुसार कार्यवाही करण्याचे तसेच
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पेन्शन, राहणीमान भत्ता ,भविष्य निर्वाह निधीचा नियमित भरणा,आकृतीबंधात सुधारणा अशा विविध मागण्यासाठी सरकार सकारात्मक विचार करीत असल्याचे मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.