नागपुरात डॉक्टरसह तिघांची १० लाखांनी फसवणूक

फसवणूक

नागपूर : खासगी फायनान्स कंपनीचा मॅनेजर असल्याचे सांगून डॉक्टरसह तिघांना १०.६५ लाख रुपयांनी गंडविल्याचे प्रकरण समोर आले आहे. फसवणूक करणाऱ्या अमरावतीच्या अनुज नरेंद्र भुयार (३७) नामक तरुणाला बजाजनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी अनुज खाजगी फायनान्स कंपनीत मॅनेजर होता. घोटाळा करण्याच्या आरोपात कंपनीने त्याला कामावरून काढले होते. त्यानंतर तो लोकांना जाळ्यात ओढत होता. त्याला कंपनीशी जुळलेल्या लोकांची माहिती होती. तो लोकांना गुंतवणूक केल्यास अधिक व्याज देण्याचे व विमा काढण्याचे आमिष दाखवत होता. त्याने अमरावतीचे डॉ. योगेश बोंडे, डॉ. चैतन्य कायंदे व प्रेमानंद टकोरे यांच्याकडून १०.६५ लाख रुपये वसूल केले. काही दिवसानंतर लोकांना अनुजचे सत्य लक्षात आले. त्यातील प्रेमानंद टकोरे यांनी बजाजनगर पोलीस स्टेशनला तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीचे प्रकरण दाखल करीत आरोपी अनुजला अटक केली.