नागपुरातील नरेंद्र हिवरे यांना गृहमंत्री पदक

नरेंद्र हिवरे

नागपूर : लकडगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांना २०२० चे केंद्रीय गृहमंत्री पदक प्रदान करण्यात आले आहे. राज्यातील १० अधिकाऱ्यांना हा सन्मान मिळाला आहे. यात हिवरे हे विदर्भातील एकमेव अधिकारी आहेत. २०१९ मध्ये गांधीसागर तलावात एका युवकाचा मृतदेह सापडला होता. दोन पोत्यांमध्ये सात तुकडे केलेला मृतदेह तलावात फेकण्यात आला होता. त्यावेळी हिवरे हे गुन्हे शाखेत तैनात होते. डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात हिवरे यांनी तपास सुरू केला. त्यांच्या पथकाने ५०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. २८ दिवसाच्या तपासानंतर मृत हा सुधाकर रंगारी असल्याची ओळख पटवण्यात आली. त्याचा खून करणारे राहुल भोतमांगे आणि राहुल रंगारी यांनाही अटक करण्यात आली. सप्टेंबर २०१९ मध्ये डीजीपीने या प्रकरणाला राज्यातील सर्वोत्कृष्ट तपास घोषित करून हिवरे यांना १० हजार रुपयांचे बक्षीसही दिले होते. पदक मिळाल्यावर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनीही त्यांना ५० हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे.