हे ढोंगी सरकार तुम्हाला पाडावे लागेल: राज ठाकरे

राज ठाकरे

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील वडनगर या गावाची अवस्था बिकट असून, तशीच परिस्थिती त्यांनी दत्तक घेतलेल्या उत्तर प्रदेशातील नागेपूर गावाची आहे. हा माणूस जेथून आला तिथली अवस्था पाहता गेल्या पाच वर्षांच्या यांच्या कारभारामुळे देशाची परिस्थिती काय झाली असेल, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी यांच्या कार्यपद्धतीवर घणघाती टीका केली. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशावरील संकट असून, हे ढोंगी भंपक सरकार तुम्हाला पाडावे लागेल. या देशात लोकशाही राहणार की, हुकुमशाही येणार यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे ते भांडुप येथे बुधवारी रात्री झालेल्या प्रचारसभेत म्हणाले.

केंद्रातील भाजप सरकारच्या गेल्‍या पाच वर्षांत जाहीर करण्यात आलेल्या सर्व योजनांचा बोजवारा उडाला आहे. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर या मूळ गावातील लोकांनाच शौचालय नसल्‍याने उघड्यावर शौचाला जावे लागते. मोदी त्यांनी जाहीर केलेल्या एकाही योजनेवर बोलायला तयार नाहीत. मात्र, योजनांच्या जाहिरातींवर साडेचार हजार कोटींचा खर्च करून जनतेला भुरळ घातली जात आहे. खोटे बोला पण रेटून बोला हाच यांचा उद्योग आहे. संपूर्ण भाजपलाच खोटे बोलण्याचा रोग जडला असल्‍याची टीका राज ठाकरे यांनी केली.

गरिबीतून मुक्‍त केल्‍याचा दावा भाजप करत असलेले चिले कुटुंबच राज यांनी यावेळी व्यासपीठावर आणले. योगेश चिले स्‍वतः मनसेचे पदाधिकारी असून, त्‍यांचा मूर्ती बनविण्याचा व्यवसाय आहे. वडील बेस्‍टचे निवृत्‍त कर्मचारी तर आई महापालिकेतून सेवानिवृत्‍त झाली आहे. भाजपचा या कुटुंबाबाबतचा दावा पूर्ण खोटा आहे. त्‍यांनी वेबपेजवरून ही माहिती गायब केली आहे. त्यामुळे खोटे बोलण्याचा रोगच भाजपमध्ये वरपासून खालपर्यंत लागल्‍याचे राज ठाकरे म्‍हणाले.

पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्‍या सर्व योजना फसल्‍या आहेत. स्‍वच्छ भारत, नमामी गंगे, उज्‍जवला गॅस योजना, स्‍टार्टअप सर्व योजना बारगळल्या आहेत. विरोधी पक्षात असताना गॅस दरवाढीच्या विरोधात भाजपवाले कंठशोष करायचे. २०१४ साली ४१० रुपयांना असणारा गॅस सिलिंडर आता ७५० रुपयांच्या घरात गेला आहे. मोदींनी दत्तक घेतलेल्‍या गावातील जनतेला प्यायला स्‍वच्छ पाणीही मिळत नसल्‍यामुळे त्या लोकांना विविध रोगांना सामोरे जावे लागत आहे. नमामी गंगा योजनेचा पूर्ण फज्‍जा उडाला आहे. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याची घोषणा फसवी निघाली. नोटाबंदीचा निर्णय साफ अयशस्वी झाला. सरकार अपयशी ठरल्यामुळे शहीद जवानांच्या नावाने राजकारण करण्याचा प्रयत्न भाजपवाले करीत असल्याची टीका त्यांनी केली.

‘प्रज्ञा सिंह यांचे समर्थन धक्कादायक’

मालेगाव बाँबस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने उमेदवारी देणे व त्याचे समर्थन करणे हा प्रकार भयानक आहे. पोलिस दलातील अधिकारी, शहिद हेमंत करकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत सगळेच आदराने बोलतात. पुरावे होते म्‍हणून त्‍यांनी कारवाई केली. तरीही प्रज्ञासिंह यांची उमेदवारी भाजपाने कायम ठेवली यावर राज ठाकरे यांनी टीका केली.

‘केवळ खोटी आश्वासने’

ईव्हीएममध्ये घोळ आहे, असे याच भागातील पूर्वीचे खा. किरीट सोमय्या सांगत असायचे. पण त्यांनी गेल्या पाच वर्षांत तोंड उघडले नाही. रेल्वे अपघातात मोनिका मोरे या युवतीला दोन्ही हात गमवावे लागले. तत्कालीन काँग्रेस सरकारने काही केले नाही पण भाजपवाल्यांनीसुद्धा खोटी आश्वासने दिली. मुंबईत वर्षाकाठी रेल्वे अपघातात १८ हजार ४२३ मृत्यू होतात. याकडेही राज ठाकरे यांनी लक्ष वेधले.

अधिक वाचा : वाराणसीत काँग्रेसकडून अजय राय; प्रियांकांच्या नावाची फक्त चर्चा!