नागपूर : मालेगाव स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर करून भाजप कट्टर हिंदुत्वाकडे झुकल्याचा संकेत दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १ मे रोजी हिंदुत्वाचे प्रतीक ठरलेल्या अयोध्येला जाण्याची शक्यता आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावर निष्क्रीय असल्याचा आरोप होत असताना पंतप्रधान मोदी यांनी फैजाबादचे भाजप उमेदवार लल्लू सिंह यांच्यासाठी अयोध्येत प्रचारसभेला संबोधित करण्याचे ठरविले आहे.
पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून पंतप्रधान मोदी अयोध्येला जात आहेत. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना अयोध्येतील रामाचे स्मरण झाल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. अयोध्येतील माया बाजार येथे पंतप्रधान मोदी भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेला संबोधित करणार असल्याचे समजते. मोदी अयोध्या भेटीदरम्यान भगवान रामलल्लाचे दर्शन आणि पूजा करणार काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उत्तर प्रदेशात सत्ता आल्यापासून भाजपने अयोध्येवर विशेष लक्ष केंद्रीत केले असून अयोध्येत प्रभू रामचंद्राची भव्य मूर्ती उभारण्याचा संकल्पही केला आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने अयोध्येमध्ये अनेक मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करीत हिंदुत्वाला खतपाणी घालण्याचे काम केले आहे. गेल्या वर्षी अयोध्येमध्ये भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाय फैजाबादचे नाव बदलून अयोध्या असे करण्यात आले असून येथे प्रभू रामचंद्राची भव्य मूर्ती उभारण्याचा संकल्पही केला आहे. लोकसभा मतदारसंघाचे नाव मात्र अद्याप फैजाबाद असेच आहे. भाजपचे लल्लू सिंह हे येथील विद्यमान खासदार आहेत. यावेळी भाजपने त्यांनाच पुन्हा तिकीट दिले आहे. काँग्रेसने या मतदारसंघामध्ये पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष निर्मल खत्री यांना उमेदवारी दिली आहे. सन २००९ च्या निवडणुकीत खत्री यांचा विजय झाला होता. महाआघाडीतर्फे सपाचे आनंदसेन यादव या मतदारसंघात उभे आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्या दौऱ्याला अनेक आयाम प्राप्त झाले आहेत.
दौऱ्याचे अनेक अर्थ
पंतप्रधान मोदी यांच्या अयोध्या दौऱ्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ६ मे रोजी उत्तर प्रदेशमधील फैजाबादसह लखनऊ, रायबरेली, अमेठी, धौरहरा, सीतापूर, मोहनलालगंज, बांदा, फतेहपूर, कौशांबी, बाराबंकी, बहराइच, केसरगंज आणि गोंडा या १४ जागांवर मतदान होणार आहे. त्यापूर्वी मोदी यांची सभा झाल्यास भाजपला फैजाबादच्या आजूबाजूला असलेल्या मतदारसंघांमध्ये देखील फायदा होऊ शकतो. मतदानापूर्वी होणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे येथील वातावरण भाजपानुकूल करण्याचे जोरदार प्रयत्न पक्षाकडून केले जाणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी-बहुजन समाज पार्टी-राष्ट्रीय लोक दल या महाआघाडीच्या आव्हानाला तोंड देणाऱ्या भाजपला मोदी यांच्या दौऱ्यामुळे उभारी मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
अधिक वाचा : हे ढोंगी सरकार तुम्हाला पाडावे लागेल: राज ठाकरे