नागपूर : प्रेमात अडसर ठरत असल्याने मुलीने प्रियकराच्या मदतीने आई-वडिलांची निर्घृण हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. गुन्हेशाखा पोलिसांनी रविवारी दत्तवाडी येथे घडलेल्या ज्येष्ठ दाम्पत्याचा हत्याकांडाचा पर्दाफाश करीत मृतांची मुलगी व तिच्या प्रियकराला गजाआड केले. ऐश्वर्या ऊर्फ प्रियंका चंपाती (वय २३) व तिचा प्रियकर मोहम्मद इखलाख खान (वय २३, रा. वडधामना) अशी अटकेतील तर शंकर अतुलचंद्र चंपाती (वय ७२) व सीमा शंकर चंपाती (वय ६४, दोन्ही रा. दत्तवाडी) अशी मृतांची नावे आहेत. ऐश्वर्या ही आयटी इंजिनीअर आहे. ती आयटी पार्कमधील एका कंपनीत काम करते. इखलाख हा क्रिकेटपटू आहे.
शंकर हे वेकोलिचे निवृत्त अधिकारी होते. आठ महिन्यांची असताना ऐश्वर्याच्या आई-वडिलांचे अपघातात निधन झाले. त्यामुळे चंपाती दाम्पत्याने तिला दत्तक घेतले. ऐश्वर्या आठवीत असताना तिचे इखलाखसोबत प्रेमसंबंध जुळले. चार महिन्यांपूर्वी याची कुणकूण शंकर यांना लागली. त्यामुळे त्यांनी दत्तवाडीतील घर विकण्याची तयारी चालविली. दीड कोटी रुपयांमध्ये घर विकून पुण्याला स्थायिक होण्याची शंकर यांची योजना होती. वडील प्रेमात अडसर ठरत असून, ते घर विकण्याच्या तयारीत असल्याचे ऐश्वर्याने इखलाखला सांगितले. त्यामुळे इखलाख संतापला. त्याने ऐश्वर्याच्या मदतीने शंकर व सीमा यांचा काटा काढण्याची योजना आखली.
कटानुसार रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ऐश्वर्या ब्युटी पार्लरमध्ये जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास चेहऱ्याला दुपट्टा बांधून इखलाख घरात घुसला. बैठक खोलीत शंकर तर बेडरूममध्ये सीमा झोपल्या होत्या. सत्तूरने इखलाखने शंकर यांच्या गळ्यावर व डोक्यावर सपासप वार केले. शंकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने सीमा यांच्यावर सत्तूरने वार केले. दोघांचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच इखलाख तेथून पसार झाला. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास ऐश्वर्या घरी परतली. घरातील साहित्य अस्ताव्यस्त होते. शंकर व सीमा रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. ऐश्वर्याने आरडाओरड केली. भाडेकरू व शेजारी जमले.
शेजाऱ्याने पोलिसांना माहिती दिली. गुन्हेशाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना ऐश्वर्यावर संशय आला. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. प्रेमात अडसर ठरत असल्याने इखलाखने हत्या केल्याचे तिने मान्य केले. त्यानंतर पोलिसांनी इखलाखलाही अटक केली.
खरबूजमधून दिले गुंगीचे औषध
ऐश्वर्या व इखलाख या दोघांनी कोणत्या वेळी काय करायचे, याची योजना तयार केली. त्यानुसार, दुपारी १२ वाजताच्या सुमारास ऐश्वर्याने खरबूजमध्ये गुंगीचे औषध मिसळले. खरबूज शंकर यांना दिले. खरबूज सेवन केल्याने शंकर बेशुद्ध झाले. शंकर बेशुद्ध झाल्याची खात्री पटताच ऐश्वर्या घराबाहेर आली. घरासमोर आधीपासूनच इखलाख उभा होता. ऐश्वर्याने त्याला इशारा केला. ती घरच्या पाळीव श्वानाजवळ उभी झाली. त्यामुळे इखलाख सहज घरात घुसला. तो घरात जाताच ऐश्वर्या मोपेड घेऊन जवळीलच ब्युटी पार्लर व नंतर तेथून बहिणीसोबत बिगबाजार येथे गेली. अवघ्या काही मिनिटांत इखलाखने दोघांची हत्या केली. लुटपाटीतून ही घटना घडल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी त्याने घरातील व आलमारीत साहित्य अस्ताव्यस्त केले. जाताना सीमा यांचे दागिने घेतले व फरार झाला.
क्राइम पेट्रोल अन् सोशल मीडिया…
ऐश्वर्या ही आयटी इंजिनीअर आहे. हत्येचा कट आखताना ती सतत क्राइम पेट्रोल बघत होती. मोबाइल व सोशल मीडियाचा आधार घेत पोलिस मारेकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे तिला माहिती होते. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी ऐश्वर्या व इखलाख या दोघांनी फेसबुक, ट्विटर आदींसह सोशल मीडियावरील अकाउंट बंद केले. जीमेलमधील डाटाही डिलिट केला. दोघे व्हॉट्सअॅप कॉलिंग करीत होते, अशी माहिती आहे.
-तर घटना टळली असती
तीन महिन्यांपूर्वी एका युवकाने शंकर यांना धमकी दिली होती. या घटनेनंतर काही दिवसांनीच त्यांना एक वाहनाने धडक दिली. यात ते जखमी झाले होते. तेव्हापासून ते घरीच राहात होते. या घटनेच्या आठ दिवसांनी चेहऱ्याला दुपट्टा बांधलेला युवक शंकर यांच्या घरात घुसला. त्याने शंकर यांना मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी शंकर यांनी वाडी पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. हा युवक दुसरा कोणी नसून इखलाखच होता. या तक्रारीची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असती तर शंकर व सीमा यांची हत्या टाळता आली असती, अशी चर्चा परिसरात होती.
क्रिकेट क्लबमधून केली होती हकालपट्टी!
२०१४मध्ये इखलाख हा विदर्भाकडून अंडर-१९ खेळला आहे. काही दिवसांपूर्वी तो नौरबीला गेला. तेथे प्रथमश्रेणी क्रिकेट सामने खेळला. सध्या तो कौंटीची तयारी करीत होता. तीन ते चार वर्षांपूर्वी बेशिस्त वर्तनामुळे त्याची एका क्रिकेट क्लबमधून हकालपट्टी करण्यात आली होती, असे कळते.
अधिक वाचा : सीबीएसई बोर्ड के रिजल्ट का इंतजार, नए तरीके से होगा 10वीं कक्षा का मूल्यांकन