नागपूर : राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने लग्नापूर्वीच संपविले जीवन

नागपूर : ऑक्टोबर महिन्यात लग्न असताना त्यापूर्वीच राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने आत्महत्या केल्याने चर्चेला पेव फुटले आहे.

शनिवारी रात्री रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे कर्तव्य बजावताना प्रसन्ना दुधाराम मस्के (वय २६, रा. वैशालीनगर, राज्य राखीव पोलिस दल गट क्रं.१३ मागे) याने रायफलीतून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. सदर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी त्याचा मोबाइल जप्त केला आहे. मोबाइलची तपासणी करण्यात येत असून, याद्वारेही पोलिस त्याच्या आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत. प्रसन्नाचे वडील राज्य राखीव पोलिस दलात होते. कर्तव्य बजावताना वडिलांचा मृत्यू झाला होता.

२०१४ मध्ये अनुकंपा तत्त्वावर प्रसन्ना एसआरपीएफमध्ये भरती झाला होता. त्याच्या तीन बहिणींचे लग्न झाले असून, तो आईसोबत राहात होता. त्याचा एक जावई पोलिस दलात आहे. काही दिवसांपूर्वीच प्रसन्नाचे एका तरुणीसोबत साक्षंगध झाले होते. ऑक्टोबरमध्ये त्याचे लग्न होणार होते. १३ जुलैपासून तो आरबीआयमध्ये तैनात होता.

शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास त्याने एसएलआर रायफल हनवटीवर ठेवून गोळी झाडून आत्महत्या केली. यादरम्यान गजानन पवार हा जवान तेथे आला. त्याला प्रसन्ना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. गजाननने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत सदर पोलिसांना कळविले.

माहिती मिळताच सदर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी प्रसन्नाचा मोबाइल जप्त केला आहे. याद्वारे पोलिस त्याच्या आत्महत्येच्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे. प्रसन्नाच्या आत्महत्येप्रकरणी सदर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

अधिक वाचा : नागपूर : सुनेने मारहाण करुन घराबाहेर काढल्याने सासूची विष प्राशन करून आत्महत्या