नागपूर : आनंदची हत्या दहशत निर्माण करण्यासाठीच

नागपूर : गिट्टीखदान भागात दबदबा निर्माण करण्यासाठी राजा लखन सिंग (वय २३, रा. व्हेटरनरी कॉलेज चौक) याने साथीदारांच्या मदतीने आनंद ऊर्फ बाबा मनोहर चौधरी (वय ५२,रा. सुरेंद्रगड) यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. बाबा चौधरी यांच्या खूनप्रकरणात गिट्टीखदान पोलिसांनी राजा व त्याचा साथीदार नाना ऊर्फ सुरेंद्र शेषमल पटेल (वय २२,रा. गिट्टीखदान) या दोघांना अटक केली आहे.

प्राणघातक हल्ला प्रकरणात राजा हा कारागृहात होता. चार महिन्यांपूर्वी तो जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. कारागृहातून बाहेर येताच राजा हा परिसरात दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नात होता. रविवारी रात्री आनंद हे लखन फसवार याच्या व्हेटरनरी चौकातील पानठेल्यावर होते. यावेळी राजा, नाना व त्याचे दोन साथीदार कारने तेथे आले. येथे त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. आनंद यांनी राजाला हटकले. याच पानठेल्यावर राजाचे वडील असल्याने तो शांतपणे तेथून निघून गेला. काही वेळाने राजा हा साथीदारांसह कारने पुन्हा पानठेल्यावर आला. बळजबरीने आनंद यांना कारमध्ये बसविले. काही अंतरावर आनंद यांना कारमधून खाली उतरिवले. आनंद यांच्यावर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात आनंद खाली पडले. मारेकरी पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. आनंद यांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून आनंद यांना मृत घोषित केले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून राजा व त्याच्या साथीदाराला अटक केली. दोघांची २८ जूनपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

अधिक वाचा : राजूरा दुराचार प्रकरण में पूर्व विधायक धोटे को 15 दिन की राहत