नागपूर : चिमुकलीसह आईची गांधीसागरमध्ये आत्महत्या

नागपूर : गांधीसागरमध्ये (शुक्रवारी तलाव) दोन वर्षांच्या चिमुकलीसह आईने उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास दोघींचे मृतदेह तलावात तरंगताना आढळले. जगदीश खरे यांनी गणेशपेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचा ताफा लगेच तेथे पोहोचला. जगदीश खरे यांनी दोघींचे मृतदेह बाहेर काढले.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केले. पोलिसांनी तलाव परिसरात शोध घेतला असता केवळ महिलेची चप्पल आढळली. महिला व मुलीच्या छायाचित्राद्वारे पोलिस दोघींची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत असताना रात्री ९.३० वाजताच्या सुमारास नातेवाईक गणेशपेठ पोलिस स्टेशनमध्ये धडकले.

पोलिसांनी दोघींचे छायाचित्र दाखविले. मात्र छायाचित्र बघून दोघी आपल्याच नातेवाईक असल्याबाबत संभ्रम निर्माण झाला. मेडिकलमधील शवागार बंद झाल्याने नातेवाइकांना दोघींचे मृतदेह दाखविणे शक्य नव्हते.

त्यामुळे मंगळवारी सकाळी नातेवाइकांना मेडिकलमध्ये नेण्यात येऊन मृतांची ओळख पटविण्यात येणार आहे. उशिरारात्री नातेवाईक पोलिस स्टेशनमध्ये आले. त्यांना छायाचित्र दाखविण्यात आले. मात्र नातेवाईक संभ्रमात आहेत. मृतांची ओळख पटणे शक्य नाही.

मंगळवारी नातेवाइकांना दोघींचे मृतदेह दाखविण्यात येईल. त्यानंतरच मृतांची ओळख पटले, सध्याच याबाबत काहीच सांगत येणार नाही, असे गणेशपेठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गांगुर्डे यांनी सांगितले.

अधिक वाचा : नागपूर : आनंदची हत्या दहशत निर्माण करण्यासाठीच

Comments

comments