नागपूर : दोनशे रुपयांची बॅग पडली २८ हजारांत

नागपूर : वापरात नसलेल्या वस्तू विकून थोडे पैसे मिळतील, हा मोह एका विद्यार्थिनीला चांगलाच महागात पडला. या विद्यार्थिनीने वापरात नसलेली बॅग दोनशे रुपयांत विक्रीसाठी ओएलएक्सलवर जाहिरात टाकली होती. दोनशे रुपये खात्यात मिळण्याऐवजी या विद्यार्थिनीच्या मैत्रिणीच्या खात्यातून भामट्याने चारच मिनिटांत २८ हजार ५१५ रुपये स्वत:च्या खात्यात वळते करून घेतले.

अनेक दिवसांपासून स्वत:जवळ पडून असलेली बॅग विक्री करण्यासाठी आपल्या बहिणीच्या मोबाइलवरून विद्यार्थिनीने शुक्रवारी दुपारी फोटोसह जाहिरात अपलोड केली. त्यानंतर काही तासांतच ओएलएक्सवरून एकाने ही बॅग खरेदीची इच्छा दर्शवीत सहकाऱ्याला पाठवत असल्याचे विद्यार्थिनीला सांगितले. मात्र, ‘दोनशे रुपये पेटीएमद्वारे अथवा तुमच्या सहकाऱ्यासोबत रोखीने पाठवा, नंतरच बॅग मिळेल’, असे विद्यार्थिनीने सांगितले. यावर, ‘मी लगेच पैसे पाठवतो’, असे समोरच्याने सांगितले. मात्र, रात्री उशिरापर्यंत पैसे मिळाले नव्हते.

यानंतर शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास विद्यार्थिनीला पुन्हा त्या खरेदीदाराचा फोन आला. ‘तुमच्या पेटीएमवर पैसे वळते होत नसल्याने मी ‘गूगल पे’द्वारे पैसे पाठवतो, तुम्ही नंबर द्या’, असे त्याने सांगितले. या विद्यार्थिनीकडे गूगल पे नसल्याने तिच्या मैत्रिणीने ‘माझ्या खात्यात पैसे मागवून घे’ म्हणत स्वत:च्या खात्याचे डिटेल्स खरेदीदाराला पाठविण्यास सांगितले.

नंतर या विद्यार्थिनीने मैत्रिणीचा गूगल पे भ्रमणध्वनी क्रमांक आणि क्यूआर कोड शेअर केला. मात्र, खरेदीदाराने कॉल सुरू असतानाच विविध तीन ट्रान्झेक्शनद्वारे २८ हजार ५१५ रुपये या मैत्रिणीच्या खात्यातून ‘मनीषा प्रकाश मोरे’ नावाच्या खात्यात वळवून घेतले. कॉल कट होताच खात्यात पैसे जमा झाले नसून कपात झाल्याचे दोन्ही विद्यार्थिनींच्या लक्षात आले. त्यांनी लगेच त्या खरेदीदाराला फोन केला असता ‘मला दहा मिनिटे द्या, मी पैसे पाठवतो’, असे त्याने सांगितले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या दोन्ही विद्यार्थिनींनी दहा मिनिटांत सीताबर्डी पोलिस ठाणे गाठले. ठाण्यातून त्या क्रमांकावर फोन केला असता त्या खरेदीदाराचा फोन ‘स्विच्ड ऑफ’ येत होता.

कमेंटचा वापर करुन दिशाभूल

– थेट खात्यातून पैशांचे देवाण-घेवाण करण्यासाठी ‘गूगल पे’मध्ये ‘What’s this for?’ हा कमेंट बॉक्स ‘व्यवहार कशासाठी आहे’, ही आठवण ठेवण्यासाठी दिला जातो. यामध्ये ‘दोनशे रुपये खात्यात जमा होणार’, असा मेसेज लिहून या खरेदीदाराने प्रत्येकी ९५०५ रुपयांचे तीन व्यवहार शनिवारी दुपारी ४.२३, ४.२४ आणि ४.२६ वाजता केले.

अशी घ्या काळजी

अनेक पेमेंट मोबाइल अॅप्लिकेशन्स रेफरल कॅश (एखाद्याने आपल्याद्वारे दुसऱ्याला ते अॅप्लिकेशन इन्स्टॉल करण्यास लावले आणि पहिला व्यवहार करण्यास लावले तर मिळणारे पैसे) देतात. यासाठी तरुणांकडून ओळखीच्या व्यक्तींना विविध अॅप्लिकेशन्सची लिंक पाठवून अॅप्लिकेशन इन्स्टॉल करण्याचा तगादा लावण्यात येते.

– यासोबतच या अॅप्लिकेशन्ससोबत बँक खातेही लिंक करण्यास सांगितले जाते. मात्र, गरज नसल्यास विनाकारण आपले बँक खाते कोणत्याही अॅप्लीकेशनसोबत लिंक करू नका.

– पेमेंट अॅप्लिकेशन वापरता येत नसल्यास व्यवहार करणे टाळा किंवा विश्वासातील व्यक्तीलाच त्यासंदर्भात विचारा.

– आपले मोबाइल क्रमांक आणि ई-मेल बँक खात्यासोबत लिंक करून बँकेद्वारे होणाऱ्या व्यवहारावर लक्ष ठेवा. कुठल्याही अनधिकृत व्यवहारांची माहिती बँक आणि पोलिसांना द्या.

– पेमेंट अॅप्लिकेशन्सवर वेळोवेळी अपडेट्स येत असतात. फिचर्स पूर्णपणे समजूनच त्याचा वापर करावा.

-स्वत:चे खाते इतरांना व्यवहारासाठी देणे टाळा

अधिक वाचा : RBI Deputy Governor Viral Acharya Quits, Cites “Personal Circumstances”

Comments

comments