भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता नागपूरला हवे गोसेखुर्दचे पाणी

Date:

नागपूर: यंदाच्या उन्हाळ्यात नागपूरकरांना अभुतपूर्व पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. भविष्यातही पाणी टंचाईचे संकेत आहेत. त्यासाठी मनपातर्फे युद्धपातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून गोसेखुर्द धरणातून शहरासाठी पाणी घेण्यावर विचार करण्यात येत आहे. त्यासाठीचा प्रस्तावही तयार करण्यात येत आहे.

टंचाईने शहराच्या इतिहासात प्रथमच पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला. एक दिवसाआड पाणी वितरण करण्यात येत आहे. गेल्यावेळी कमी पावसामुळे जलाशय उन्हाळ्यापूर्वीच कोरडे पडले होते. यंदा पाणीसंकटाचा सामना शहराला करावा लागला. गेल्या २० दिवसांपासून शहराला एक दिवसाआड पाणी मिळत आहे. २२ ऑगस्टपर्यंत अशीच स्थिती राहणार आहे. अद्यापही शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयाची पाणी पातळी वाढलेली नाही. त्यामुळे पाणीकपातीचा​ निर्णय कायम आहे. अशात पर्यायी व्यवस्था करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

शहराची लोकसंख्या पुढील दहा वर्षांत ४० लाखांपेक्षा जास्त होईल. आसपासचा परिसरही शहराच्या हद्दीत येईल. त्यावेळी पाण्याची मागणीही वाढेल. त्यामुळे भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता गोसेखुर्द धरणातही पाणी आरक्षण केल्यास ही समस्या सुटू शकते असे मत पुढे आले आहे. सध्या मौद्यापर्यंत गोसेखुर्द धरणातून पाणीपुरवठा होतो. पुढील काळात जलवाहिन्या वाढवून ते शहरातही आणता येईल. यादिशेने विचार सुरू झाला आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी यासंदर्भात जलप्रदाय विभागाला प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास शहराचा पुढील शंभर वर्षांचा पाणीप्रश्न सुटेल, असे मानले जात आहे.

विदर्भ टॅक्स पेयर्स संघटनेने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन शहरापासून ६० किलोमीटरवरील गोसेखुर्द धरणातून पाणी घ्यावे अशी मागणी केली आहे. १९८१मध्ये शहराची लोकसंख्या १३ लाख होती. पुढील ३० वर्षांत ती दुप्पट झाली २०४० पर्यंत ती तिप्पट होईल. त्यामुळे पाण्यासाठी आतापासून नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. गोसेखुर्द धरणातून पाणी पंम्पीग करून नागपूरला आणणे सोपे आहे. राज्य सरकारने यात हस्तक्षेप करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला तशा सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

पालकमंत्री बावनकुळेंनी मात्र असे करण्याची गरज नसल्याचा दावा केला. कन्हान नदीला पूर आल्यास तेथील पाणी तोतलाडोह येथे पंम्प करण्यासाठी राज्य सरकारने ३ हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. कन्हान नदीला तीनवेळा पूर आल्यास तेथील पाणी तोतलाडोड जलाशयात साठवणूक करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. असे झाल्यास १०० वर्षे शहराला पाण्याची अडचण येणार नाही, असा दावाही पालकमंत्र्यांनी केला. तरी ‘​व्हिटीए’ने ही बाब पूर परिस्थिती ओढावली तेव्हाच येणार असल्याचे नमूद करीत पर्यायी उपाय करण्याची मागणी केली.

अधिक वाचा : सोन्याचा आजवरच्या सर्वोच्च पातळीला स्पर्श; ३८ हजार रुपये तोळे!

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related