खवळलेल्या पाकने वाघा सीमेवर समझौता एक्स्प्रेस रोखली

Samzota Express Stops
Samzota Express Stops

नागपूर: काश्मीरशी संबंधित राज्यघटनेतील कलम ३७० हटवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयानंतर खवळलेल्या पाकिस्ताने समझौता एक्स्प्रेस वाघा सीमेवरच रोखली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज पाकिस्तानमधून समझौता एक्स्प्रेस भारतात येत होती. मात्र वाघा सीमेवर आल्यानंतर ती थांबवण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला. पाकच्या या निर्णयामुळे अनेक प्रवासी सीमेवरच अडकले आहेत. ‘आमचे गार्ड आणि ड्रायव्हर भारताच्या सीमेत प्रवेश करणार नाहीत’, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. भारतानेच आता त्यांचे गार्ड आणि ड्रायव्हर पाठवावेत, असे पाकिस्तानने सांगितले आहे. दरम्यान, भारताने आपले गार्ड आणि ड्रायव्हर पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर देखील पाकिस्तानने समझौता एक्स्प्रेस रोखली होती. त्यानंतर ४ मार्चला ती पुन्हा सुरू करण्यात आली. आता पाकने पुन्हा एकदा ही एक्स्प्रेस थांबण्याचा निर्णय घेतला आहे. पाकने सोमवारी भारताबरोबरचा व्यापारही बंद करण्याचा निर्णय घेतला असून राजनैतिक संबंधांमध्येही कपात केली आहे.

पाककडून आदेश आल्यानंतर समझौता एक्स्प्रेसच्या ड्रायव्हरने वाघा सीमेवर गाडी थांबवली आणि सुरक्षेच्या कारणामुळे ही गाडी अटारीला जाणार नाही असे जाहीर केले. गाडीच्या सुरक्षेला कोणताही धोका नाही असे भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागाने गाडीच्या ड्रायव्हरला कळवले. मात्र, पाकिस्तानकडून तसे आदेश आल्याखेरीज आपण गाडी पुढे नेणार नाही, अशी भूमिका ड्रायव्हरने घेतली.

समझौता एक्स्प्रेस आठवड्यातून दोन दिवस दिल्ली आणि अटारी ते पाकिस्तानातील लाहोरपर्यंत धावते. लाहोरहून ती सोमवार आणि गुरुवारी निघते. ही एक्स्प्रेस भारत-पाक दरम्यान झालेल्या शिमला करारानंतर २२ जुलै १९७६ या दिवशी सुरू करण्यात आली होती. पहिली ट्रेन अमृतसरहून निघाली होती. सुमारे ५२ किमीचे अंतर पार केल्यानंतर ती लाहोरला पोहोचली होती.

भारतीय चित्रपटांना पाकिस्तानात बंदी

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तानची आगपाखड सुरूच आहे. भारताबरोबर असलेल्या द्विपक्षीय राजनैतिक संबंधांच्या स्तरात घट करून भारताशी असलेले व्यापारी संबंध तोडल्यानंतर आता भारतातील चित्रपटांना पाकिस्तानात बंदी घातली आहे.

पाकिस्तानात कोणताही भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार नाही. तसेच कोणताही चित्रपट पाकिस्तानात दाखवला जाणार नाही. काश्मिरी जनतेला पाठिंबा म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष माहिती सल्लागार फिरदौस आशिक अवान यांनी दिली. तर, दुसरीकडे भारतातील निर्मात्यांनीही पाकिस्तानात कोणताही चित्रपट न पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

अधिक वाचा : भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता नागपूरला हवे गोसेखुर्दचे पाणी