सोन्याचा आजवरच्या सर्वोच्च पातळीला स्पर्श; ३८ हजार रुपये तोळे!

Gold rate & silver rate
Gold rate & silver rate

नागपूर: नवी दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात १,११३ रुपयांची वाढ होऊन प्रति १० ग्रॅमसाठी सोन्याच्या दराने ३७,९२० रुपये या आजवरच्या सर्वोच्च पातळीला स्पर्श केला. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्ध भडकण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात तेजी नोंदवल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर सायंकाळी सातच्या सुमारास पुण्यात आणि मुंबईत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी अनुक्रमे ३८,६०० रुपयांवर आणि ३७,०४२ रुपयांपर्यंत उसळला.

औद्योगिक क्षेत्राकडून वाढलेली मागणी आणि नाणी तयार करणाऱ्यांकडून नोंदविण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील मागणीमुळे चांदीच्या भावातही ६५० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे चांदीचा भाव प्रतिकिलोला ४३,६७० रुपयांवर पोहोचला. सराफा बाजार विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक तसेच स्थानिक बाजारांमध्ये सोन्याची मागणी वाढल्याने दरांमध्ये तेजी नोंदविण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (न्यूयॉर्क) सोन्याचा भाव १४८७.२० डॉलर प्रति औंसावर तर, चांदीचा भाव १६.८१ डॉलर प्रति औंसावर पोहोचला.

‘देशांतर्गत बाजारात आजवर प्रति १० ग्रॅमला ३७,९२० रुपये हा सोन्याचा सर्वोच्च भाव ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती वाढत असून, सोमवारी हा दर ३६,९७० रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. दिल्लीमध्ये बुधवारी शुद्ध सोन्याच्या दरात (९९.९ टक्के) १,११३ रुपयांची वाढ होऊन तो प्रति १० ग्रॅमसाठी ३७,९२० रुपयांच्या घरात पोहोचला. तर ९९.५ टक्के शुद्ध सोन्याच्या दरात १,११५ रुपयांची वाढ होऊन तो प्रति १० ग्रॅमसाठी ३७,७५० रुपयांवर पोहोचला. तयार चांदीची किंमत ६५० रुपयांनी वाढून प्रति किलो ४३,६७० रुपयांवर पोहोचली,’ अशी माहिती अखिल भारतीय सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी दिली. दिल्लीस्थित सराफा बाजारातही चांदीच्या नाण्यांची मागणी वाढल्याने शेकडा किमतीमध्ये एक हजार रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याचेही जैन यांनी नमूद केले.

आंतरराष्ट्रीय घडामोडी कारणीभूत
आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, चीन-अमेरिकेतील फिस्कटलेली व्यापार बोलणी, इराण-रशियातील वाढता तणाव तसेच, बुधवारी अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सैनिक संचलनाच्या विरोधात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी आदींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला फंड, विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या ट्रेझरी आणि गोल्ड ईटीएफकडून मागणी वाढली. त्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या भावावर परिणाम झाला. भारताचा रुपया घसरल्याने देशात सोन्याच्या भावात वाढ होण्यासाठी ‘प्रोत्साहन’ मिळत आहे. एमसीएक्सवर दुपारी चारपर्यंत सोन्याचा भाव ३७,८५० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला होता. आंतरराष्ट्रीय व्यापारक्षेत्रात स्थैर्य आल्याशिवाय भाव खाली येण्याची शक्यता दिसत नाही. गेल्या १५ वर्षांत भारतात सोन्याने सरासरी वार्षिक १२ टक्के परतावा दिला आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेत गेल्या १५ वर्षांत सरासरी वार्षिक ९.५ टक्के परतावा मिळाला आहे. ही आकडेवारी पाहता आणि सुरक्षित बँकेतील ठेवींचे व्याजदर लक्षात घेता अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांत दीर्घकालीन गुंतवणूकदारांना सोन्याने खूपच आकर्षक परतावा दिला आहे. जागतिक पातळीवर सोन्याचा प्रति औंसाचा दर १५१० डॉलर या सहा वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहे. एमसीएक्सवर सायंकाळी सात वाजता सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला ३८,४०० रुपयांवर होता, अशी माहिती पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे सीईओ अमित मोडक यांनी दिली.

अधिक वाचा :  लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याच्या निर्णयाचा चीननं केला विरोध