Nagpur: मध्ये कोविड रुग्णालयात महिला डॉक्टरसोबत अश्लील लगट.

Nagpur

Nagpur : एका बाजूला सध्या कोरोना बाधितांचा उपचार करणारे रुग्णालय रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या गर्दीने गजबजून गेले आहे. तिथे काम करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना श्वास घ्यायलाही वेळ नाही. अशातच एका खासगी कोविड रुग्णालयात महिला डॉक्टरसोबत अश्लील लगट केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

धक्कादायक म्हणजे अश्लील लगट केल्याचा आरोप तिथल्या एका वरिष्ठ डॉक्टरवरच लागला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नागपुरातील एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या 25 वर्षीय महिला डॉक्टरने तिच्या वरिष्ठ डॉक्टरवर तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. पीडित महिला डॉक्टरने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित रुग्णालयात ती गेले काही दिवसांपासूनच नोकरीवर लागली होती. 26 एप्रिल रोजी रात्री तिथेच काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरने तिला रात्रपाळीच्या ड्युटी वेळी चेंजिंग रूममध्ये बोलावून घेतले. कामानिमित्त डॉक्टरांनी बोलावले असेल म्हणून ती चेंजिंग रूममध्ये गेली असता आरोपी डॉक्टरने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत अश्लील लगट करण्याचा प्रयत्न केला.

Nagpur अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेमुळे महिला डॉक्टर प्रचंड घाबरली. तिने प्रतिकार करत स्वतःची सुटका करून घेत स्वतःचे घर गाठले. तिला घाबरलेल्या अवस्थेत पाहून कुटुंबियांनी विचारपूस केली असता घडलेला प्रकार समोर आला. त्यानंतर कुटुंबियांनी पीडितेला मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये नेऊन सर्व प्रकार महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवत डॉक्टर नंदू रहांगडालेला अटक केली आहे.