नागपूर: शारीरिक सुखाची मागणी, महिला डॉक्टरवर हॉस्पिटलमध्येच अत्याचाराचा प्रयत्न

नागपूर: शारीरिक सुखाची मागणी, महिला डॉक्टरवर हॉस्पिटलमध्येच अत्याचाराचा प्रयत्न

नागपूर: शारीरिक सुखाची मागणी करून महिला डॉक्टरवर हॉस्पिटलमध्येच अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना कोराडी मार्गावरील एका हॉस्पिटलमध्ये घडली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून सहकारी डॉक्टरला अटक केली आहे. डॉ. नंदु रहांगडाले (वय ३९ रा. ट्रस्ट ले-आऊट , हिलटॉप, अंबाझरी) असे अटकेतील डॉक्टरचे नाव आहे.

हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर आहे. पीडित २४ वर्षीय महिला डॉक्टर काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये रूजू झाली. तेव्हापासून डॉक्टरची वाईट नजर पीडित महिला डॉक्टरवर होती. सोमवारी रात्री महिला डॉक्टर खोलीत होती. तो सुद्धा खोलीत गेला. महिला डॉक्टरकडे शारीरिक सुखाची मागणी केली. महिला डॉक्टरने नकार दिला. त्यानंतर आरोपीने अश्लील चाळे करून महिला डॉक्टरवर अत्याचाराचा प्रयत्न केला. महिला डॉक्टरने त्याला धक्का दिला. ती बाहेर आली. मानकापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

यापूर्वी अजनी परिसरातही एका डॉक्टरने हॉस्पिटलमध्येच १९ वर्षीय परिचारिकेवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता. एका आठवड्यातील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे.