मुंबई इंडियन्सची गाडी रुळावर येणार? आज राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामना

मुंबई इंडियन्सची

मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएल मोसमाची अडखळती सुरुवात केली आहे. मुंबईला पाच पैकी केवळ दोन सामने जिंकण्यात यश आले आहे. मात्र, मुंबईला बहुतांश मोसमांत सुरुवातीला सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश येत असल्याचे पाहायला मिळाले असून हा संघ मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावतो. यंदा मुंबईचे सुरुवातीचे पाचही सामने चेन्नईमध्ये झाले. परंतु, आता आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून मुंबईचे पुढील चार सामने दिल्लीच्या फिरोझ शहा कोटला मैदानात होणार आहेत. गुरुवारी मुंबईसमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान असेल. या सामन्याला दुपारी ३.३० वाजता सुरुवात होईल.

फलंदाजांना धावांसाठी झुंजावे लागले मुंबईने यंदाच्या मोसमात पहिल्या तीन पैकी दोन सामने जिंकले होते. मात्र, त्यानंतर त्यांचा सलग दोन सामन्यांत पराभव झाला. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या पराभवांमध्ये मुंबईने जेमतेम १३० धावांचा टप्पा पार केला होता. चेन्नईच्या खेळपट्ट्या या संथ आणि फिरकीला अनुकूल होत्या. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव वगळता मुंबईच्या फलंदाजांना या खेळपट्ट्यांवर धावा करण्यासाठी झुंजावे लागले. त्यामुळे आता दिल्लीत सामने होणार असल्याचा मुंबईच्या फलंदाजांना नक्कीच आनंद असेल.

रोहितने पाच सामन्यांत २०१ धावा केल्या असून यंदा दोनशे धावांचा टप्पा पार केलेला तो मुंबईचा एकमेव फलंदाज आहे. त्यामुळे रोहितला इतरांची साथ मिळणे गरजेचे आहे. मुंबई ने मागील दोन सामन्यांत केवळ तीन परदेशी खेळाडूंसह खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दिल्लीच्या खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांनाही थोडीफार मदत मिळण्याची अपेक्षा असल्याने नेथन कुल्टर-नाईलला संधी मिळू शकेल. दुसरीकडे राजस्थानने मागील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केल्याने त्यांच्या संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे.