सतत हेडफाेनचा वापर, 80 डेसिबलपेक्षा अधिक आवाजामुळे येतोय बहिरेपणा; 6% लाेकांना त्रास

हेडफाेनचा वापर,

भारतात लाेकांमध्ये बहिरेपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढते ध्वनिप्रदूषण, ८० डेसिबलपेक्षा जास्त कर्णकर्कश आवाजामुळे श्रवणशक्तीचा ऱ्हास हाेताे. तसेच सतत हेडफोनवर मोठ्या आवाजात गाणी एेकल्यामुळेही हा त्रास हाेताे. सध्या देशभरातील सुमारे ६.३ टक्के लाेक या आजाराने त्रस्त आहेत. औरंगाबादच्या कान-नाक-घसा डाॅक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सावजी यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ३ मार्च रोजी जागतिक श्रवण दिन आहे. ‘हिअरंग केअर फॉर ऑल’ ही या वर्षीची थीम आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी ही माहिती देण्यात आली.

ध्वनिप्रदूषण, हेडफोनचा अतिवापर, काही वेळा अपघात-आजार वा जन्मजात व्यंगामुळे बहिरेपणाचे रुग्ण वाढत आहेत. कानावर आवाजच पडत नसेल तर संवाद साधता येत नाही आणि त्या व्यक्तीचे आयुष्य कठीण बनते. मूकबधिर व्यक्तींचे आयुष्य तर अधिक कठीण असते. या पार्श्वभूमीवर आैरंगाबादेतील ईएनटी डाॅक्टरांनी बहिरेपणा आणि त्यासंबंधित उपचार पद्धतीबाबत जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. डीजे बँड वाजवणाऱ्या लोकांना बहिरेपणाची समस्या लवकर जाणवते. कंपनीमध्ये मोठमोठ्याने होणाऱ्या आवाजाचा परिणामही कामगारांवर होत असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

हेडफोनचा अतिवापर टाळा

डाॅ म्हणाले, ‘मोठ्या आवाजामुळे बहिरेपणाच्या समस्या वाढत आहेत. हेडफोनवर सतत मोठ्या आवाजात ऐकल्यामुळे बहिरेपणाची समस्या जाणवत असल्याचे अनेक रुग्णांच्या तपासणीतून जाणवते. ८० डेसिबल्सपेक्षा अधिक तीव्रतेचा आवाज यामुळे श्रवणशक्तीचा ऱ्हास होतो. याबाबत काळजी घ्यावी.’

मूकबधिर मुलांसाठी कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया ठरतेय वरदान

डाॅ म्हणाले, ‘मूकबधिर मुलांसाठी वरदान ठरणाऱ्या कॉक्लियर इम्प्लांटसारख्या शस्त्रक्रियांची व्याप्ती वाढत आहे. ५ वर्षांपेक्षा लहान मुलांवर ही शस्त्रक्रिया केल्यास त्यांना फायदा होतो. यामध्ये ७ ते ८ लाख रु. खर्च येतो. शासनाच्या अँडिम स्कीमच्या माध्यमातून ९०% खर्च केला जात आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेतही या शस्त्रक्रियेची व्याप्ती वाढत आहे.