नागपूर : महावितरणने ठाणे सर्कलमधील मुंब्रा, शीळ, कळवा आणि नाशिक झोनमधील मालेगाव या भागांचा वीजवितरण व देखभाल दुरुस्तीची जबाबदारी फ्रॅन्चायझी तत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे राज्यात फ्रॅन्चायझी मॉडेल अपयशी ठरल्यानंतर महावितरणकडून पुन्हा एकदा आणखी काही शहरातील भागांसाठी खासगी फ्रॅन्चायझींची नियुक्ती करण्यात आली आहे. महावितरणच्या या निर्णयाला विरोध होऊ लागला आहे.
महावितरण व्यवस्थापनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वीज कामगार अभियंता संघटना कृती समितीने विरोध केला आहे. यासंबंधीचे आदेश रद्द करावे, या मागणीकरता सोमवारी कृती समितीतर्फे काटोल रोड येथील महावितरणच्या प्रादेशिक संचालक कार्यालयासमोर द्वार सभा घेण्यात आली. या द्वारसभेत कर्मचाऱ्यांनी निदर्शने करत शासन व प्रशासनाच्या निषेध करत फ्रॅन्चायझी देण्याचे आदेश रद्द करण्याची मागणी केली. त्याचबरोबर फ्रॅन्चायझी धोरणाला महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपनीतील सर्वच संघटनांचा विरोध असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
विशेष म्हणजे, यासंबंधी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह ऊर्जा सचिव, महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना कृती समितीतर्फे विरोध करणारे पत्र देण्यात आले. या पत्राला अनुसरूनच निदर्शने करण्यात आली. राज्यात प्रत्येक झोन, सर्कल व विभागीय कार्यालयासमोर द्वार सभांचे आयोजन करण्यात येत आहे.
नागपूर कार्यालयासमोर झालेल्या द्वारसभेत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे (आयटक) संयुक्त सचिव डॉ. सी. एम. मौर्य, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ (बीएमएस)चे धुंडीराज बर्वे, शंकर पहाडे, सबॉर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशनचे मेंढे, विद्युत क्षेत्र श्रमिक कामगार युनियनचे गजानन सुपे, महाराष्ट्र राज्य तांत्रिक कामगार युनियनचे निकम यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित केले.
अधिक वाचा : नागपूर : चिमुकलीसह आईची गांधीसागरमध्ये आत्महत्या