नागपूर – रेल्वे तिकीट केंद्रात चोरांचा धुमाकूळ

नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या आरक्षण तिकीट केंद्रात तसेच प्लॅटफॉर्मवर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पहिली घटना प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर २३ जूनच्या मध्यरात्री घडली. सत्यम नारायण दुबे (३०, मोदाहा, उत्तरप्रदेश) हे झोपले असताना चोरट्याने त्यांचा १२ हजार २७८ रुपये किंमतीचा मोबाइल चोरून नेला.

दुसरी घटना पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर घडली. यवतमाळ येथील कृष्णा एकनाथ शाहू हे वणीला जाण्याकरिता नागपूर रेल्वेस्थानकावर आले होते. नंदीग्राम एक्स्प्रेसची ते वाट पाहात होते. गाडीला उशीर असल्यामुळे त्यांना झोप लागली. त्याचा फायदा घेत केसल लालजी सिंग (२०, रा. मुंबई) याने त्यांचा ११ हजार ७०० रुपये किमतीचा मोबाइल लंपास केला. मोबाइल दिसत नसल्याने शाहू यांनी लोहमार्ग पोलिस ठाणे गाठत मोबाइल चोरी झाल्याची तक्रार केली.

पोलिसांनी सीसीटीव्हीत तपासणी केली असता आरोपी केसल सिंग हा मोबाइल लंपास करताना दिसला. त्वरित त्याला पोलिसांनी हुडकून काढले. त्याच्यावर चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील कारवाई लोहमार्ग पोलिस करीत आहेत.

अधिक वाचा : नागपूर : वीज कामगार अभियंता संघटनेची निदर्शने