नागपूर : वडिलांसमोर नऊ वर्षीय मुलाचे अपहरण

नागपूर : सदरमधील रेसिडेन्सी मार्गावर वडिलांसमोरुनच नऊ वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आले. ही घटना २६ जुलैला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने सदर पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलाचा शोध सुरू केला आहे. शिवम रघुनाथ चव्हारे रा. सावनेर, असे मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ यांचे सावनेरमध्ये पोल्ट्री फार्म आहे. २६ जुलैला ते शिवम व नातेवाइक रवींद्र शेंद्रे यांच्यासोबत नागपुरात आले. इतवारी येथे गेले. तेथून तिघे सीताबर्डी येथील नातेवाइकाकडे गेले. तेथे जेवन केल्यानंतर तिघेही पायी छावणीकडे जात होते.

रेसिडेन्सी मार्गावर रवींद्र व शिवम अचानक बेपत्ता झाले. दोघे सावनेरला गेल्याचा समज रघुनाथ यांना झाला. त्यामुळे रघुनाथ हे गिट्टीखदानमध्ये राहणाऱ्या मित्राकडे गेले. २७ जुलैला ते सावनेर येथे गेले. त्यांच्या पत्नीने शिवम याच्याबाबत विचारणा केली. रघुनाथ यांना धक्का बसला. रवींद्र हाही गावातून बेपत्ता होता. त्यामुळे त्यानेच अपहरण केल्याचा संशय बळावला.

रघुनाथ यांनी सदर पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान, रवींद्र हा गावात आला. शिवम सोबत आला नसल्याचे त्याने रघुनाथ यांना सांगितले. तसे बयाणही रवींद्र याने सदर पोलिसांना दिले. त्यामुळे शिवम याचे अपहरण कोणी केले, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस शिवम याचा शोध घेत आहेत.

अधिक वाचा : रॉबिन सिंहनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी केला अर्ज