नागपूर : केंद्रात कोणाचे सरकार असावे याचा कौल देण्यासाठी राज्यात आज, सोमवारी लोकसभा निवडणुकीचा चौथा आणि शेवटचा टप्पा पार पडत आहे. मुंबई, ठाण्यासह १७ मतदारसंघांतील मतदान मतयंत्रात बंदिस्त होणार असून, एकूण ३ कोटी, ११ लाख ९२ हजार ८२३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. राज्यात आत्तापर्यंत तीन टप्प्यांमध्ये ३१ मतदारसंघांमधील मतदान शांततेत पार पडले असून, शेवटच्या टप्प्यासाठीही निवडणूक आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. ‘चला मतदान करू या’ असा सांगावा देत मतदानाचा टक्का भरघोस वाढवण्याचे आवाहन सरकारी आणि सामाजिक स्तरांतून करण्यात येत आहे. महाराष्ट्र वगळता उत्तर प्रदेश (१३), राजस्थान (१३), पश्चिम बंगाल (८), मध्य प्रदेश (६), ओडिसा (६), बिहार (५), झारखंड (३) आणि जम्मू-काश्मीर (१) या राज्यांतही मतदान होत आहे.
सोमवारच्या मतदानात मुंबई, ठाणे, पालघरमधील शिवसेना-भाजपचे उमेदवार असलेल्या १५ खासदारांचे भवितव्य ठरेल. गेल्या निवडणुकीत या पट्ट्यात युतीचे १०पैकी १० खासदार निवडून आले होते. मात्र, यंदा अनेक ठिकाणच्या लढती चुरशीच्या असल्यामुळे मतदारराजा काय कौल देतो, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
आज कुठे मतदान?
मुंबई उत्तर
मुंबई उत्तर-पश्चिम
मुंबई उत्तर-पूर्व
मुंबई उत्तर-मध्य
मुंबई दक्षिण-मध्य
मुंबई दक्षिण
ठाणे
कल्याण
भिवंडी
पालघर
नाशिक
नंदुरबार
धुळे
दिंडोरी
मावळ
शिरुर
शिर्डी
‘मोबाइल नेऊ नका’
मतदान करतानाचे चित्रीकरण एका मतदाराने मोबाइल फोनवरून फेसबुक लाइव्ह केल्याचे निदर्शनास आल्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदान केंद्रात मोबाइल फोन आणण्यास व वापरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. तरी आज, सोमवारी मतदानासाठी येणाऱ्या मतदारांनी मतदान केंद्रात मोबाइल फोन आणू नयेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
शिपाई, पोलिसाचा मृत्यू
ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त असलेले उल्हासनगर महापालिकेतील शिपाई भगवान मगरे यांचा रविवारी ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांना उष्माघाताचा त्रास झाल्याचेही सांगितले जात आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तावर २३ एप्रिल रोजी अचानक तब्येत बिघडलेल्या दशरथ कान्हू कोरडे या पोलिस कर्मचाऱ्याचाही शनिवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अधिक वाचा : Gajbhiye demands repoll at 384 Umrer segments