नागपूर : जमिनीचे व्यवहार करताना मोठ्या प्रमाणात कर थकवल्याच्या संशयावरून शहरातील बिल्डर्सवर कारवाई केल्यानंतर प्राप्तिकर विभागाने आता कोळसा व्यावसायिकांवर मोर्चा वळवला आहे. वीजप्रकल्पांसाठी लागणारा कोळसा खुल्या बाजारात विकून त्याद्वारे कोट्यावधींचा नफा कमावल्याच्या माहितीवरून गुरुवारी प्राप्तिकर विभागाने कोळसा व्यावसायिकांवर कारवाई केली. यात नागपूरसह चंद्रपूर व बिलासपूर येथील कोळसा व्यावसायिकांचा समावेश आहे.
स्वामी फ्युएल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला कोळसा पुरवण्याचे कंत्राट मिळाले आहे. या कंपनीच्या संचालकांमध्ये संदीप अग्रवाल, रंजित छाबडा, नितीन उपरे, श्यामसुंदर मित्तल यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कोळशाचा पुरवठा करण्याबरोबरच यांचा मालवाहूतक करण्याचाही व्यवसाय आहे.
गेल्या काही दिवसांपासून या कोळशाची मालवाहतूक करताना या व्यावसायिकांकडून वीजनिर्मिती केंद्रांना पुरवण्यात येणारा कोळसा खुल्या बाजारात परस्पर विकण्यात येत होता. विशेष म्हणजे हा कोळसा महागड्या दराने बाजारपेठेत विकून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता या व्यावसायिकांनी गोळा केली होती. त्यातच मालवाहतुकीच्या व्यवसायातही या समूहाकडून मोठ्या प्रमाणात कर थकवण्यात आला होता.
त्यामुळे विभागाच्यावतीने समूहाच्या नागपूर, चंद्रपूर आणि बिलासपूर येथील जवळपास २० कार्यालये व त्यांच्या निवासस्थानावर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान काही लॉकर्स उघडण्यात आले असून, त्यातून अनेक बेहिशेबी व्यवहार हातांनी लिहिलेली कागदपत्रे जप्त करण्यात आली, त्यातच व्यवसायाशी संबंधित इतरही अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
रक्कम हवालात ?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कागदपत्रांवरून हे व्यावसायिक कोळसा विकून त्याद्वारे येणारी रक्कम हवालामध्ये तर चालवत नाही ना, असाही संशय विभागाला आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस चालणाऱ्या कारवाईत आणखी काय माहिती पुढे येते, यावरून तपासाची दिशा ठरणार आहे. मात्र, या कारवाईतून वीजकंपन्यांना कोळसा पुरवणारे आणखी काही व्यावसायिक अशाप्रकारे कोळशाची खुल्या बाजारात विक्री करतात का, हेसुद्धा पुढे येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
अधिक वाचा : नगपूर : रेल्वेच्या खासगीकरणाचा डाव