जगातील प्रभावी महिला नेतृत्वाच्या यादीत नागपूरच्या महापौरांचा समावेश

नागपूर : राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून प्रभावी महिला नेतृत्व करणा-या जगभरातील २५ प्रभावशाली स्त्रियांच्या यादीत नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांना स्थान मिळाले आहे.

जगभरातील चांगल्या गोष्टींचे वार्तांकन करणाऱ्या ‘नॅशनल जिऑग्राफिक’ने ही यादी नुकतीच प्रकाशित केली. नागपुरातील सेंटर फॉर क्रिएटिव्हीटी ॲण्ड इनोव्हेशनच्या पूजा पुसदेकर आणि आयसीआयसीआय फाऊंडेशनच्या सुश्मिता चॅटर्जी यांनी ही माहिती देत महापौर नंदा जिचकार यांचे त्यांच्या कक्षात अभिनंदन केले. या दोन्ही संस्थेच्या विद्यार्थ्यांनी महापौर नंदा जिचकार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी नागपूर महानगरपालिकेद्वारे यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या महापौर इनोव्हेशन अवॉर्ड आणि ऑगस्ट महिन्यात होऊ घातलेल्या ‘इनोव्हेशन पर्व’ विषयासंदर्भात उपस्थित विद्यार्थ्यांशी चर्चा केली. नागपुरात खूप टॅलेन्ट आहे. हे टॅलेन्ट जगासमोर मांडण्यासाठी व्यासपीठाची आवश्यकता होती. महापौर इनोव्हेशन कौन्सीलच्या माध्यमातून हे व्यासपीठ आता उपलब्ध झाले आहे. विद्यार्थ्यांनी या व्यासपीठावर येऊन आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पना जगासमोर मांडाव्या, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले. दोन्ही संस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. यापुढेही इनोव्हेशन पर्वात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अधिक वाचा : नागपूर : कोळसा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर छापे