रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या डीजेला मनाई ; पोलिसांवर हल्ला

नागपूर : रात्री उशिरापर्यंत सुरू असलेला डीजे बंद करण्यास सांगितल्याने २५ युवकांनी पोलिसांना धक्काबुक्की करून त्यांच्यावर तूफान दगडफेक केली. यात पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले. ही खळबळजनक घटना महालमधील नाईक रोडवर रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हल्ला करणे तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून एका हल्लेखोराला अटक केली.

निखिल प्रकाश मडावी (वय २७, रा. तेलीपुरा, सिरसपेठ) असे अटकेतील हल्लेखोराचे नाव आहे. सूत्रधार साहिल भोसले (वय २०), हिमांशू भोसले व त्याचे २२ साथीदार फरार आहेत. साहिल व हिमांशूवर यापूर्वीही मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी साहिलचा वाढदिवस होता. यासाठी त्याने घरी मित्रांसाठी पार्टी आयोजित केली. पार्टीत डीजे वाजविण्यात येत होता. रात्री ११ वाजतापर्यंत डीजे सुरू असल्याने एका नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षाकडे तक्रार केली. कक्षाने कोतवाली पोलिसांना नाईक रोडवर जाण्यास सांगितले. पोलिस शिपाई दिनेश भागवत गजभिये हे तेथे गेले. त्यांनी साहिलला डीजे बंद करण्यास सांगितला. साहिल, हिमांशू व त्याच्या साथीदारांनी दिनेश यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ सुरू केली. दिनेश यांनी बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. याबाबत कळताच पोलिस उपनिरीक्षक ए. एस. टोपले यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.

साहिल, हिमांशू व त्याच्या साथीदारांनी टोपले व त्यांच्या सहकाऱ्यांनाही शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. टोपले यांनी नियंत्रण कक्षाला माहिती देत अतिरिक्त पोलिसांचा ताफा मागविला. अतिरिक्त ताफा पोहोचण्यापूर्वी साहिल व त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर तूफान दगडपेक केली. यात दिनेश, टोपले यांच्यासह पाचजण जखमी झाले. पोलिसांचा अतिरिक्त ताफा तेथे पोहोचताच हल्लेखोर पसार झाले. मात्र, पोलिसांनी निखिल याला पकडले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून हिमांशू, साहिल व त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे.

अधिक वाचा : नागपूर : ट्रक सोडून पळाले रेतीचोर