नागपूर : ट्रक सोडून पळाले रेतीचोर

नागपूर : कळमना परिसरात अवैध रेती वाहतूक होत असल्याचे शहर तहसीलदारांच्या चमूला निदर्शनास आले. दोन ट्रक अडवून चौकशी करण्यात आली. ट्रकचालकाला पावती मागण्यात आली. पावती देण्याच्या बहाण्याने ट्रकचालकांनी मात्र ट्रकला लॉक करून पोबारा केला. याप्रकरणी कळमना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूर शहर तहसीलदार सूर्यकांत पाटील, मंडळ अधिकारी अनिल ब्रह्मे, राजेश देठे, अमोल चव्हाण आदी कर्मचाऱ्यांच्या चमूसह कळमना परिसरात अवैध रेती वाहतुकीवर कारवाईसाठी गेले. या परिसरात दोन ट्रकमध्ये वाळू वाहतूक होत असल्याचे त्यांना कळले. एमएच ३६ एए १२९२ आणि एमएच ३६ एए ०५४८ या क्रमांकाच्या ट्रकला थांबवून चौकशी करण्यात आली. ट्रकचालकांनी मात्र तहसीलदारांच्या चमूच्या डोळ्यात धूळफेक करीत ट्रक लॉक करून पोबारा केला.

रात्रभर ठेवली पाळत

शनिवारी रात्रभर हे ट्रक कळमना परिसरातच उभे होते. ट्रकचालक परत येतील म्हणून पोलिसांनी ट्रकवर रात्रभर पाळत ठेवली. तहसीलदार यांनी कळमना पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे या ट्रकच्या क्रमांकावरून चौकशी केली असता हे ट्रक भंडारा येथील संजय गिरीपुंजे आणि अशोक गभणे यांचे असल्याचे पुढे आले.

‘त्या’ दोन ट्रकचीही चौकशी

याच परिसरात तहसीलदारांच्या पथकाला आणखी दोन ट्रक आढळून आलेत. मात्र या ट्रकचालकांकडे मोबाइलमध्ये मध्यप्रदेशची पावती असल्याची आढळून आले. या पावत्या खऱ्या की खोट्या, याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. कुठलेही कागदपत्रे या ट्रकचालकांकडे आढळून आले नसल्याने अवैध वाहतुकीचा हा प्रकार असल्याची शक्यता तहसीलदार यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा : Nagpur : Youngsters of the city breaking traffic rules at every turn