नागपुरात अवैध दारूविक्रीत दोन गटात मारहाण , चार जखमी

दारूविक्रीत

नागपूर : अवैध दारूविक्रीची तक्रार केल्यामुळे निर्माण झालेल्या वादात दोन गटात हाणामारी झाली. यात चार लोक जखमी झाले. मंगळवारी रात्री कोतवालीतील भुतेश्वर नगर येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. हा वाद पांडे व ठाकूर कुटुंबांमधील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहन पांडे पूर्वी दारूविक्री करायचा. त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल होते. नंतर त्याला मनपात सफाई कामगार म्हणून नोकरी लागली. पोलिसांचे म्हणणे आहे की, पांडेने दारूविक्री बंद केली होती. परंतु पांडेचे शेजारी शिवकुमार ठाकूर, लोकेश ठाकूर, सुजीत ऊर्फ मोनू ठाकूर आणि आशीष ठाकूर यांना पांडे दारूविक्री करीत असल्याचा संशय होता. असे सांगितले जाते की, ठाकूर यांनी याची पोलीस व अबकारी विभागात तक्रारही केली होती. कारवाई झाली नाही. उलट पांडे कुटुंबाला ठाकूर कुटुंबाने तक्रार केल्याचे माहीत झाले. यावरून वाद वाढला.

मंगळवारी रात्री वाद झाला. मोहन पांडे व त्याचा मुलगा राहुल पांडे हे सुजीत ठाकूर व त्याचा भाऊ शिवकुमार यांना ‘तूू समाजात आमची बदनामी करीत असल्याचे म्हणत शिवीगाळ करू लागला. मोहन पांडेने वस्तऱ्याने वार करून ठाकूर बंधूंना जखमी केले. यानंतर शिवकुमार, लोकेश, सुजीत व आशीष ठाकूरनेही तलवार व काठीने मोहन पांडे व त्याच्या मुलाला जखमी केले. कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. ठाकू र कुटुंबांचे म्हणणे आहे की, पोलिसांच्या उपस्थितीत पांडे व त्याच्या मुलाने हल्ला केला. त्यांचे पोलिसांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे कारवाई होत नाही. पोलिसांनीही अवैध दारू विक्री करीत असल्याची बाब नाकारली आहे. तेव्हा कोण खरे बोलत आहे, याची कसून चौकशी होण्याची गरज आहे.