नागपुरात ठाणा मालखाना प्रभारीकडून १६ लाखाचा अपहार

ठाणा

नागपूर : सक्करदरा पोलीस ठाण्याच्या मालखाना प्रभारीने १६ लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील हवालदार रामचंद्र टाकळखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. टाकळखेडे २०१२ पासून ठाण्यात मालखाना प्रभारी होते. ते ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे त्यांचा कार्यभार सोपविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, टाकळखेडे यांच्याद्वारे मालखान्यात अपहार केल्याची माहिती पुढे आली. टाकळखेडेने जप्त केलेल्या दागिन्यांची हेराफेरी केली. मूळ दागिन्यांच्या बदली बनावट दागिने ठेवले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी टाकळखेडेला चांगलेच सुनावले. त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचाऱ्यावरच गुन्हा दाखल झाल्याने सक्करदरा ठाण्यात खळबळ माजली. ठाण्यातील मालखाने हे नेहमीच चर्चेत असतात.