आसारामपुत्र नारायण साई बलात्कार प्रकरणात दोषी

नागपूर : बलात्कार प्रकरणातील आरोपी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला आज सूरत सत्र न्यायालयानं जहांगीरपुरा आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं आहे. त्याला ३० एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.

आसाराम बापू आणि नारायण साई यांच्याविरोधात सूरतमधील बहिणींनी बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात नारायण साईला सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. पोलिसांनी पीडित बहिणींचे जबाब आणि घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. आसारामविरोधात गांधीनगरमधील कोर्टात खटला सुरू आहे. नारायण साईविरोधात कोर्टानं आतापर्यंत ५३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या आहेत.

नारायण साईविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो भूमिगत झाला होता. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो सातत्यानं ठिकाणं बदलत होता. सूरतचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी साईला अटक करण्यासाठी ५८ पथकं तयार केली होती आणि त्याचा शोध घेण्यात येत होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी डिसेंबर २०१३ रोजी साईला हरयाणा-दिल्ली सीमेजवळ अटक केली होती.

अधिक वाचा : स्टायलीश ‘राधे’ पुन्हा भेटीला येतोय!