उद्या फ्रेंडशिप डे, जाणून घ्या ‘फ्रेंडशिप डे’ला कशी झाली सुरुवात?

Friendship day
Friendship day

नागपूर: भारतात उद्या ४ ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. यादिवशी मित्र-मैत्रिणी आपल्या खास मित्र परिवाराला भेटवस्तू, खास संदेश आणि पार्टी करतात. तर काही जण पिकनिक प्लान करून मैत्रिच्या दिवसाचं धुमधडाक्यात सेलिब्रेशन करतात. पण इतक्या उत्साहात साजरा केला जाणाऱ्या या ‘फ्रेंडशिप डे’ला नेमकी सुरुवात झाली तरी कशी? याचा कधी विचार केलाय का? हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

‘फ्रेंडशिप डे’चा इतिहास…
दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जाणारा फ्रेंडशिप डे भारततही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात फ्रेंडशिप डेचं महत्त्वंही वाढलंय. पण भारतात फ्रेंडशिप डेला सुरुवात होण्याआधी हा खास दिवस दक्षिण अमेरिकेत विशेषत: पॅराग्वेमध्ये खूप वर्षांपासून मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. १९५८ साली पहिल्या आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डेचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यानंतर सर्वांनी हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यास सुरुवात केली.

आंतरराष्ट्रीय ‘फ्रेंडशिप डे’
संपूर्ण जगभरात विविध देशांत विविध दिवशी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. २७ एप्रिल २०११ रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या आम सभेत ३० जुलै रोजी आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव अधिकृतरित्या संमत करण्यात आला. पण भारतासोबतच अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.

 अधिक वाचा : अभिनेता विद्युत जामवालने ‘जंगली’ सिनेमासाठी चीनमध्ये पटकावला पुरस्कार