अभिनेता विद्युत जामवालने ‘जंगली’ सिनेमासाठी चीनमध्ये पटकावला पुरस्कार

Vidyut Jammwal
Vidyut Jammwal

नागपूर: अभिनेता विद्युत जामवाल याने चीनमध्ये झालेल्या ‘जॅकी चॅन आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ सोहळ्यात दोन पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. विद्युतला ‘जंगली’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अॅक्शन सिक्वेन्स दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अॅक्शन फॅमिली फिल्म असे दोन पुरस्कार मिळाले आहेत.

‘अॅक्शन चित्रपटांची दखल घेतल्या जाणाऱ्या चीनमध्ये जगातील सर्वोत्तम अॅक्शन पुरस्कार सोहळ्यात गौरव होणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे’, असं विद्युतनं सांगितलं. जॅकी चॅन पुरस्कार सोहळा हा अॅक्शन चित्रपटांसाठीचा ऑक्सर असल्याची भावना विद्युतनं यावेळी व्यक्त केली.

जॅकी चॅन आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात तब्बल १५० हून अधिक सिनेमांचा समावेश होता. यात भारतीय चित्रपटाचा गौरव होणं ही देशासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचंही विद्युत म्हणाला.

‘भारतात अॅक्शन चित्रपटांना चाहता वर्ग मिळणं तसं कठीण आहे. पण ‘जंगली’ सिनेमा अॅक्शनसोबतच कौटुंबिक सिनेमा असल्याने चाहत्यांनी चित्रपटाला तुफान प्रतिसाद दिला. चित्रपटाचे दिग्दर्शक विनीत जैन आणि प्रिती सहानी यांनी जंगली चित्रपटातून भारताला जागतिक स्तरावरील अॅक्शन चित्रपटांच्या यादीत नेऊन ठेवलं यासाठी त्यांचे मी आभार व्यक्त करतो’, असं विद्युत म्हणाला.